RBI AI : UPI पेमेंट अधिक स्मार्ट! AI च्या मदतीने चालता बोलता होणार व्यवहार
RBI AI : भारतीय रिझर्व्ह बँका आता एआयचा वापर पेमेंटसाठी करणार आहे. युपीआय पेमेंटसाठी एआयचा वापर होईल. त्यासाठी नवीन सिस्टम आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय बँकेने त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे.
नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आता युपीआय पेमेंटसाठी नवीन आयुध आणण्याचा विचार करत आहे. झटपट व्यवहारासाठी एआय (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार आहे. त्यासाठी नवीन सिस्टम तयार करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence-AI) आधारे UPI वर संवादाच्या माध्यमातून व्यवहार करण्यात येईल. त्यासाठी नवीन सिस्टम आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय बँकेने त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आज झाली. त्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी संवादात्मक व्यवहाराची माहिती दिली.
नवीन तंत्रज्ञान दिमतीला
आरबीआय गव्हर्नर यांनी युपीआय पेमेंट करण्यासाठी संवादात्मक व्यवहारावर भर दिला आहे. एआय सिस्टम आधारे अनेक जणांना चालता-बोलता व्यवहार करता येईल. केंद्रीय बँकेने ग्राहकांना नवीन तंत्रज्ञान प्रस्तावित केले आहे.
बँका कशा करतील AI चा वापर
खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फिनटेक कंपन्या यांनी डिजिटल बँकिंग सेवांसाठी एआयचा वापर करण्यावर भर देत आहेत. सेवांचा विस्तार करण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग टूलचा उपयोग करुन बँकिंग सेवा झटपट पोहचवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी चॅटबॉ्टसचा पण वापर करण्यात येत आहे.
या बँकांच्या सेवा
देशाच्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेकडे चॅटबॉट ईवा सेवा आहे. ही ग्राहकांना, कर्जदात्यांना बँकिग सेवा देते. एक्सिस बँक पण ChatGPT चा वापर करण्यावर भर देत आहे. भारतीय स्टेट बँकेने पण बिझनेस एनालिटिक्स, AI आणि ML उपयोग वाढवला आहे.
युपीआय लाईटची मर्यादा वाढवली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय लाईट माध्यमातून व्यवहाराची मर्यादा वाढवली आहे. आरबीआय क्रेडिट पॉलिसी आधारे विना इंटरनेट UPI Lite ची सेवा सुरु करण्यात आली होती. त्यात 200 रुपयांचे पेमेंट करता येत होते. आता व्यवहाराची मर्यादा वाढवून ती 500 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे देशात डिजिटल पेमेंटचा वापर वाढेल.
रेपो दरात वाढ नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कुठलाच बदल केला नाही. यापूर्वीच तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला होता. गेल्या दोन महिन्यात महागाई वाढली आहे. पण त्याचा परिणाम भारतीय अर्थ धोरणावर होणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. आरबीआयने रेपो दर (Repo Rate) 6.50 टक्के कायम ठेवला. यापूर्वी एप्रिल आणि जून महिन्यात सुद्धा व्याजदरात वाढ झाली नाही. रेपो दरात या वर्षात, फेब्रुवारी 2023 मध्ये बदल झाला होता. त्यावेळी 0.25 टक्के वाढ झाली होती.