RBI On Home Loan : बँकांची मनमानी नाही चालणार! गृहकर्जाबाबत आरबीआयने टोचले कान
RBI On Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गृहकर्जदारांना मोठा दिलासा आहे. केंद्रीय बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. गृहकर्ज पूर्णपणे चुकते केल्यानंतरही बँका कर्जदारांची अडवणूक करतात. त्यांना नाहक त्रास देतात. त्यांचे असे कान टोचले.
नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गृहकर्जदारांना (Home Loan) मोठा दिलासा दिला. स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे चाकरदार, नोकरदार, व्यावसायिक सर्वात अगोदर होम लोनसाठी बँकांकडे अर्ज करतात. बँकाकडून गृहकर्ज देतात. अनेक जण प्रामाणिकपणे कर्ज फेड करतात. व्याजदर वाढले तरी कुरबूर न करता वाढीव हप्ता भरतात. कर्जाची संपूर्ण रक्कम चुकती केल्यानंतर बँका (Bank) मात्र अनेक ग्राहकांची नाहक अडवणूक करतात. कर्जासाठी ग्राहक मालमत्ता, संपत्तीची कागदपत्रे गहाण ठेवतो. ती परत मागण्यासाठी नाहक फेऱ्या मारायला लावतात. ग्राहकांची अडवणूक होते. काही प्रकरणात ग्राहकांना असे अनुभव येतात. म्हणजे मुद्दल रक्कम, त्यावरील मोठे व्याज परत करुन सुद्धा रजिस्ट्री पेपरसाठी (Registry Paper) ग्राहकांची अडवणूक होते. या सर्व प्रकरणावर आता आरबीआयने बँकांना चपराक लगावली आहे. आरबीआयने असा मोठा निर्णय घेऊन ग्राहकांच्या मनावरील बोजा उतरवला आहे.
नाहीतर दंडाचा फटका
आरबीआयने बँकांसाठी खास नियम आणला आहे.गृहकर्जासाठी ग्राहक मालमत्ता कागदपत्रे तारण ठेवतो. कर्ज परतफेडीनंतर ही कागदपत्रे ग्राहकांना 30 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. कर्ज फेड करुनही ग्राहकांना रजिस्ट्री कागदपत्रांसाठी नाहक बँकांना विनवण्या कराव्या लागत होत्या. ही अडचण आरबीआयने दूर केली आहे. जर बँकांनी कागदपत्रे 30 दिवसांच्या आत परत केली नाही तर बँकांना दररोज 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ग्राहकांच्या मालमत्ता कागदपत्रे परत करण्याविषयी हा नियम तयार करण्यात आला आहे.
कागदपत्रे हरवल्यास नुकसान भरपाई
कर्जदाराकडून बँका मालमत्ता तारणसंबंधीची कागदपत्रे घेतात. काही कारणांनी ही कागदपत्रे गहाळ होतात. खराब होतात. बँका अशावेळी टोलवाटोलवी करतात. पण आता बँकांना जबाबदारी झटकता येणार नाही. अशा घटनांमध्ये बँकांवर नुकसान भरपाईची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जर कागदपत्रे हरवली तर बँकांना पुढील 30 दिवसांत ग्राहकांना ही कागदपत्रे नवीन तयार करुन द्यावी लागतील.
5000 रुपयांचा प्रत्येक दिवशी दंड
भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले आहेत. नवीन नियमानुसार बँकांना 30 दिवसांच्या आत ग्राहकांची मुळ कागदपत्रे परत करावी लागतील. बँका असे करण्यात अपयशी ठरल्यास त्यांना प्रत्येक दिवशी 5000 रुपयांचा दंड बसेल. अनेक ग्राहकांनी आरबीआयकडे याविषयीची तक्रार केली होती. बँकांसह एनबीएफसीला कसूर केल्यास दंडाचा फटका बसणार आहे. या नियमांचे पालन लागलीच करावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.