RBI FD : रेपो दरातील वाढ पथ्यावर, मुदत ठेव योजनेत गुंतवणुकीची हीच योग्य वेळ?
RBI FD : कधी कधी संकट पण फायदा घेऊन येते, असे म्हणतात. आज रेपो दर वाढीचा निर्णय झाला. त्याचा परिणाम ईएमआय वाढीने दिसून येईल. पण दुसरीकडे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे फायद्याची ठरेल का?
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 नंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (RBI Monetary Policy) पहिली बैठक झाली. चालु आर्थिक वर्षातील ही शेवटची बैठक होती. तज्ज्ञांच्या अंदाजानुसारच, आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे. महागाई काबूत ठेवण्यासाठी आरबीआयने हे कडक पाऊल टाकले आहे. आता कर्ज आणि ईएमआय मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कधी कधी संकट पण फायदा घेऊन येते, असे म्हणतात. आता देशातील सर्वच बँका मुदत ठेवीवरील (Fixed Deposit) व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. एसएजी इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता यांनी अंदाज वर्तविला की, देशातील बँका आता एफडीवरील व्याज दरात वाढ करतील. त्यामुळे एफडीतील (FD) गुंतवणूक फायद्याची ठरते.
अमित गुप्ता यांनी लाईव्ह मिंटला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार रेपो दरात वृद्धीचा परिणाम बँकेच्या कर्जावर आणि मुदत ठेवीवर होणार आहे. बँकेच्या रेपो दरात वृद्धीनंतर गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर त्याचा परिणाम दिसून येईल. व्याज दर वाढीनंतर ग्राहकांच्या मासिक ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या देशाच्या प्रमुख बँकांमध्ये, भारतीय स्टेट बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि कोटक बँका 3 टक्के तर 6.35 टक्क्यांपर्यंत एफडीवर व्याज मिळत आहे. 2 वर्षांसाठी एसबीआय एफडीवर 6.75 व्याज दर आहे. ॲक्सिस बँकेच्या एफडीवर 7.26 टक्के, एचडीएफसी बँकेच्या एफडीवर 7 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या मुदत ठेवीवर 7 टक्के तर कोटक बँकेच्या एफडीवर 6.75 टक्के, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इंडसइंड बँकेच्या 2 वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे.
आरबीआयने रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर आता रेपो दर 6.25 टक्क्यांहून 6.50 टक्के इतका झाला आहे. महागाई आटोक्यात येत असल्याने रेपो दरात मोठी वाढ करण्यात आलेली नाही. रेपो दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना कर्ज पुन्हा महाग मिळतील. तर ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना वाढीव ईएमआयचा सामना करावा लागेल.
आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता. आज रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी रेपो दरात वाढीची घोषणा केली.