रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ, आता तुमचा कर्जाचा हप्ता किती वाढणार
मे पूर्वी 5.65% व्याजदराने मिळणारे गृहकर्ज आता 8.15% वर पोहोचले आहे. म्हणजेच, 20 वर्षांसाठी 20 लाखांच्या कर्जावर, तुम्हाला दरमहा सुमारे 2,988 अधिक EMI भरावे लागेल.
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत रेपो दरात (Repo Rate) 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी ही माहिती दिली. त्यानुसार आता रेपो दर 6.25 टक्क्यांहून 6.50 टक्के इतका झाला आहे. रेपो दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांना गृहकर्जापासून सर्व कर्जे पुन्हा महाग मिळतील. त्यांचा ईएमआयचा हप्ता वाढणार आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) हे पाऊलं उचलले आहे. परंतु त्याचा फटका कर्ज घेणाऱ्या सर्व जनतेलाच बसणार आहे.
एका वर्षात ईएमआय सुमारे 2988 रुपयांनी वाढला
मे पूर्वी 5.65% व्याजदराने मिळणारे गृहकर्ज आता 8.15% वर पोहोचले आहे. म्हणजेच, 20 वर्षांसाठी 20 लाखांच्या कर्जावर, तुम्हाला दरमहा सुमारे 2,988 अधिक EMI भरावे लागेल.
कसा वाढणार तुमचा हप्ता
असे गृहीत धरू की त्या व्यक्तीने मे 2022 मध्ये रेपो दरात पहिली वाढ होण्यापूर्वी 20 वर्षांच्या कालावधीसाठी 6.7 टक्के व्याजदराने 30 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. त्याला दरमहा 22,722 रुपये EMI भरावा लागत होता. परंतु RBI ने सलग सहा वेळा रेपो रेट एकूण 2.50 टक्क्यांनी वाढवला. त्यामुळे कर्जाचा दर 6.7 टक्के वरुन 9.2 टक्क्यांपर्यंत गेला. त्यामुळे 22,722 रुपये EMI आता 27,379 रुपये होईल. म्हणजेच या कालावधीत त्याला दरमहा 4,657 रुपये अधिक खर्च करावे लागतील.
ऑटो लोन EMI गणना
आपण 10 लाख रुपयांची कार खरेदी केली आहे आणि त्यावर 5 वर्षांसाठी 8 लाख रुपये कर्ज घेतले आहे. रेपो दरात वाढ होण्यापूर्वी तुम्ही हे वाहन कर्ज 6 टक्के दराने घेतले होते. त्यानुसार, तुम्हाला दरमहा 15,466 रुपये EMI म्हणून भरावे लागत होता. आता व्याजदर 8.50 पर्यंत गेला तर तुमचा EMI देखील 16,413 रुपये झाला.
रेपो रेटचा थेट बँक कर्जावर परिणाम
RBI ने ठरवलेल्या रेपो रेटचा थेट बँक कर्जावर परिणाम होतो. जेव्हा रेपो रेट कमी होते, तेव्हा कर्ज स्वस्त होतात आणि ते वाढल्यानंतर, बँका देखील त्यांचे कर्ज महाग करतात. त्याचा परिणाम होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोन अशा सर्व प्रकारच्या कर्जांवर होतो.
रेपो रेट काय आहे
रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो रेट हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने ईएमआयमध्येही वाढ होते.