लॉकडाऊन काळात कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ, बांधकाम क्षेत्राला जबर फटका
स्थावर मालमत्तेच्या किमतींवर मागील काही वर्षात सर्वाधिक परिणाम करणारा घटक हा कच्च्या मालाच्या किमती आहेत.
मुंबई : स्थावर मालमत्तेच्या किमतींवर मागील काही वर्षात सर्वाधिक परिणाम करणारा घटक हा कच्च्या मालाच्या किमती आहेत. लोखंडी सळई, सिमेंट यांच्या किमतीत वाढ झाल्याने बांधकाम बजेट संकटाला एकप्रकारे इंधनच मिळाले आहे. घर बांधणीतील पाईपमध्ये वापरात येणारे प्लास्टिक, रेसिन्स, इन्स्युलेशन सामान यांच्याही किमती मागील काही महिन्यात भरमसाठ वाढल्या आहेत. आता महामारीमुळे अत्यावश्यक कच्च्या मालाच्या किमतीत आणखी वाढ झालीय. व्यापाऱ्याकडील पुरवठ्यातील तूट, हे सर्व बाजारांतील विकासकांसाठी आव्हान ठरले आहे. या कच्च्या मालाच्या संकटामुळे महामारीच्या पहिल्या लाटेनंतर काम सुरू केलेल्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग मंदावला आहेत (Real Estate response on lockdown effect on prices of Raw material in Construction field).
महागाईवर रिअल इस्टेट उद्योगाची प्रतिक्रिया काय?
नरेडको महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक मोहनानी म्हणाले, “आम्ही केंद्र सरकारला लोखंड व सिमेंटच्या किमती नियंत्रणात आणण्याची विनंती केली आहे. मागील काही महिन्यात लोखंडाचे दर 20 हजार रुपये प्रति टनाने वाढले आहेत. त्यात जवळपास 50 टक्के इतकी वाढ आहे. याखेरीज तांबे व अॅल्युमिनियमच्या किमतीतील वाढीचाही बांधकाम खर्चावर परिणाम झाला आहे. रिअल इस्टेट क्षेत्र दुसरी लाट आणि लॉकडाऊन निर्बंधांचा सामना करीत असतानाच कच्च्या मालाच्या किमतीतील या वाढीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राच्या महसुलाला ब्रेक लागला आहे.”
परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पावर परिणाम
“कच्च्य मालाच्या किमतीत घट व्हावी, अशी मागणी विकासक समुदायाकडून मागील काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. पण सरकार या मागणीला गांभीर्याने घेत नाही. याचा परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पावर परिणाम होत आहे. तसेच कच्च्या मालाची तूट व त्यातून वाढणाऱ्या किमतीचा फक्त बांधकामाच्या खर्चावर परिणाम होणार नसून येत्या काळात ही समस्या वाढत जाणारी असेल,” असं मत सुमित वूड्स लिमिटेडचे संचालक भूषण नेमलेकर यांनी व्यक्त केलं.
रिअल इस्टेट प्रकल्पांच्या किमती कमी करणे अशक्य झालेय
विजय खेतान समूहाचे संचालक अनूज खेतान म्हणाले, “मागील काही महिन्यांत काही कच्च्या मालाच्या किमतीत फार मोठी वाढ झालीय. त्यामुळे रिअल इस्टेट प्रकल्पांच्या किमती कमी करणे अशक्य झाले आहे. काही अत्यावश्यक कच्च्या मालाच्या किमती उत्पादकांनीच कोव्हिड-19 निर्बंधांमुळे वाहतूक महागल्याचे सांगत वाढवल्या आहेत. मात्र, किमतीतील ही वाढ महामारीच्या सध्याच्या दुसऱ्या लाटेमुळे तात्पुरती आहे.”
“सिमेंट, लोखंड महागले, या क्षेत्रातील मागणी अनाकलनीय”
द गार्डियन्स रिअल इस्टेट अॅडव्हायझरीचे कार्यकारी संचालक जयेश राठोड म्हणाले, “कच्च्या मालाच्या किमतीत मागील काही महिन्यात झालेल्या वाढीमुळे सिमेंट व लोखंड महागले आहे. या क्षेत्रातील अनाकलनीय मागणी, यामागे असलेल्या वेगवेगळ्या शक्ती व कोव्हिड – 19 महामारीमुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे ही स्थिती आहे. एकदा लॉकडाऊन उठले की, स्थावर मालमत्तांच्या किमतीत हळूहळू वाढ झाल्याचे येत्या काही महिन्यात दिसेल. वेगवेगळ्या बाजारानुसार तो बदल काही टक्क्यांनी वेगळा असेल.”
“देशाच्या काही भागात पुढील तिमाहीच्या अखेरपर्यंत मालमत्तांच्या किमतीत किंचित वाढ दिसेल. मात्र 2021 ची अखेर येईपर्यंत यात बराच बदल झालेला दिसेल. हे सारेकाही सध्या देशात असलेले आरोग्याशी निगडित संकट स्थिर होण्यावरच अवलंबून असेल. त्याला लागूनच हे बदल होतील,” असंही जयेश राठोड यांनी नमूद केलंय.
हेही वाचा :
Lockdown: ग्राहकांची घर खरेदीकडे पाठ, मजूर नसल्याने अनेक प्रकल्प अर्धवट; बिल्डरांना दुहेरी फटका
बसल्या बसल्या डोकं लावलं, ‘कम्युनिटी लिविंग’चा बिझनेस उभारला, तीन मित्रांचा 40 कोटीचा डोलारा!
मुंबई रियल इस्टेट क्षेत्रात इतिहास घडला, 10 दिवसांत 3 हजार 95 घरांची विक्री!
व्हिडीओ पाहा :
Real Estate response on lockdown effect on prices of Raw material in Construction field