GST Collections : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जीएसटीचे रेकॉर्ड ब्रेक संकलन; कराची वसुली 1.68 लाख कोटी रुपयांवर
आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्याच महिन्यात रेकॉर्ड तोड जीएसटीचे संकलन झाले आहे. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाचा आकडा हा 1.68 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्याच महिन्यात रेकॉर्ड तोड जीएसटीचे संकलन (GST Collections) झाले आहे. एप्रिल (April) महिन्यात सरकारचे टोटल जीएसटी कलेक्शन 1.68 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जी आतापर्यंतची सर्वोच्च जीएसटीची (GST) वसुली माणण्यात येत आहे. मार्च महिन्यामध्ये 142095 कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले होते. मात्र एप्रिल महिन्यात झालेले जीएसटीचे संकलन हे मार्च महिन्याच्या तुलनेत तब्बल 25 हजार कोटींनी अधिक आहे. एप्रिल 2021 मध्ये 139708 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. जुलै 2021 पासून सातत्याने जीएसटी संकलनाचा आकडा हा 1 लाख कोटींच्या पुढे राहिला आहे. चालू वर्ष 2022 बद्दल बोलायचे झाल्यास जानेवारी महिन्यात जीएसटी संकलनाचा आकडा हा 140986 कोटी रुपये होता. फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे एकूण संकलन 133026 कोटी रुपये झाले होते, तर मार्चमध्ये 142095 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. एप्रिल महिन्यात तर जीएसटी वसुलीने सर्व रेकॉर्ड तोडले असून, जीएसटीचे संकलन 1.68 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
33159 कोटी रुपयांचे केंद्राचे योगदान
एप्रिल महिन्यात जे जीएसटी संकलन झाले, त्यामध्ये केंद्राचा आकडा हा 33159 कोटी रुपये होता, राज्यांचा जीएसटी संकलनाचा आकडा हा 41793 कोटी रुपये होता. तर इंटीग्रेटेड जीएसटी संकलनाचा आकडा हा 81939 कोटी रुपये इतका आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल महिन्यात जीएसटीच्या संकलनात वार्षिक आधारावर 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर वस्तू आयात करामध्ये तीस टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती आर्थमंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. जीएसटी संकलनात झालेली ही वाढ समाधानकारक असल्याचे आर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
20 एप्रिलला रेकॉर्ड ब्रेक जीएसटीची वसुली
एप्रिल महिन्यात 20 तारखेला एका दिवसामध्ये सर्वाधिक कराचे संकलन झाले. 20 एप्रिल 2022 रोजी एकूण 57847 कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला. विशेष म्हणजे 20 एप्रिल रोजी 4-5 या एका तासात तब्बल 88 हजार ट्रांझेक्शनच्या माध्यामतून 8000 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला. तर 20 एप्रिल 2021 रोजी एकूण 7.22 लाख ट्रांझेक्शन झाले होते. या ट्रांझेक्शनच्या माध्यमातून जवळपास 48 हजार कोटींच्या जीएसटीचे संकलन झाले होते. कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यानंतर जीएसटीच्या संकलनामध्ये वाढ होताना दिसत आहे.