LIC IPO Subscription Status : पहिल्याच दिवशी एलआयसीच्या IPOला विक्रमी प्रतिसाद; विमाधारक श्रेणीतील अर्ज सर्वाधिक
देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसी आयपीओला किरळकोळ गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सर्वाधिक अर्ज हे विमाधारकांनी केले आहेत. एलआयसीचे कर्मचारी देखील गुंतवणूक करताना दिसत आहेत.
LIC IPO Subscription Status : देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसी आयपीओला (LIC IPO) किरकोळ गुंतवणूकदारांचा (Retail Investor) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. आजपासून एलआयसीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. पहिल्याच दिवशी एलआयसीच्या पॉलिसीधारक गुंतवणूकदारांचा एवढा प्रतिसाद मिळाला की, पहिल्याच दिवशी दुपारी साडेबारापर्यंत पॉलिसीधारक क्षेणीमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्रीब्रशन (Subscribe) झाले आहे. या व्यक्तीरिक्त एलआयसी आयपीओला एलआयसीच्या कर्मचाऱ्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारी बारापर्यंत एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेला कोटा जवळपास 50 टक्के पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. एकूण सर्व मिळून पहिल्या दिवशी दुपारपर्यंत एलआयसीचा आयपीओ 41 टक्के सब्सक्राईब झाला आहे.
विमाधारक श्रेणीतील सर्वाधिक अर्ज
आज सकाळी एलआयसीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या आयपीओसाठी सर्वाधिक अर्ज हे विमाधारक आणि एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचे आले आहेत. एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. या उत्साहाचे कारण म्हणजे त्यांना गुंतवणुकीवर देण्यात आलेली सूट हे आहे. सरकारने एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीवर प्रति शेअर्समागे 45 रुपयांची तर विमाधारकांना 60 रुपयांची सूट दिली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि गुंतवणूकदार आयपीओमध्ये जोरदार गुंतवणूक करताना दिसत आहेत.
आजपासून एलआयसीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला
गेल्या अनेक दिवसांपासून एलआयसीचा आयपीओ बाजारात कधी येणार याबाबत चर्चा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून, एलआयसीचा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. पहिल्याच दिवशी एलआयसीच्या आयपीओला विक्रमी प्रतिसाद मिळत असून, या गुंतवणुकीमध्ये एलआयसीचे कर्मचारी आणि विमाधारक आघाडीवर आहेत.