Just Dial नंतर आणखी एक कंपनी रिलायन्सच्या ताब्यात, इतक्या कोटींचा व्यवहार
Reliance | रिलायन्स बिग व्हेंचर्सकडून Strand Life Sciences मधील तब्बल सव्वा दोन कोटी समभाग विकत घेण्यात येणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत रिलायन्स बिग व्हेंचर्स या कंपनीत 160 कोटी रुपयांची गुंतवणूकही करेल.
मुंबई: इन्फोर्मेशन सर्च अँण्ड लिस्टिंग क्षेत्राती जस्ट डायल (Just Dial) या कंपनीवर ताबा मिळवल्यानंतर आता रिलायन्स समूहाने आणखी एक कंपनी विकत घेतली आहे. बंगळुरुस्थित Strand Life Sciences ही आयटी कंपनी रिलायन्स समूहातील रिलायन्स बिग व्हेंचर्सकडून (Reliance Biz Ventures) विकत घेण्यात आली. रिलायन्स समूहाने सेबीला दिलेल्या माहितीनुसार हा व्यवहार 393 कोटी रुपयांमध्ये पार पडला.
रिलायन्स बिग व्हेंचर्सकडून Strand Life Sciences मधील तब्बल सव्वा दोन कोटी समभाग विकत घेण्यात येणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत रिलायन्स बिग व्हेंचर्स या कंपनीत 160 कोटी रुपयांची गुंतवणूकही करेल. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून आगामी काळात रिलायन्स बिग व्हेंचर्सकडे Strand Life Sciences कंपनीची 80.30 टक्के हिस्सेदारी असेल.
स्ट्रँड लाईफ सायन्सेस कंपनीची पार्श्वभूमी
स्ट्रँड लाईफ सायन्सेस या कंपनीची स्थापना 2000 साली झाली होती. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीने 88.70 कोटी रुपयांची उलाढाला केली होती. 2019-20 मध्ये हा आकडा 109.84 कोटी आणि 2018-19 मध्ये 96.60 कोटी रुपये इतका होता. गेल्या तीन वर्षात कंपनीचा निव्वळ नफा अनुक्रमे 8.48 कोटी, 25.04 कोटी आणि 21.66 कोटी रुपये इतका होता.
शेअर मार्केटमध्ये रिलायन्सच्या समभागाची उसळी
भांडवली बाजारात रिलायन्सचा समभाग 2400 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी या समभागाने 4.10 टक्क्यांची उसळी घेतली. आगामी काळात या समभागाचा भाव आणखी वधारण्याची शक्यता आहे. सध्या रिलायन्सचे एकूण भांडवली मूल्य 15.40 लाख कोटींच्या घरात आहे.
महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाचा ताबा
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गावरही अदानी समूहाच्या ताब्यात गेला आहे. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार आता अदानी समूहकाडे असेल. या 24 तपासणी नाक्यांची उभारणी करून व्यापारी मालवाहतुकीवरील सेवा शुल्क संकलनाचे अधिकार ‘सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेड’कडे होता.
मात्र, अदानी समूहाने या कंपनीतील 49 टक्के वाटा विकत घेतला आहे. यासाठी 1680 कोटी रुपये मोजण्यात आले. त्यामुळे आता महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या किं वा महाराष्ट्रात येणाऱ्या व्यापारी वाहतुकीवरील ‘सेवा शुल्क’ वसुलीचे अधिकार अदानी समूहाला मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला होता. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळविला असून, आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, अशी माहिती अदानी समूहाकडून देण्यात आली होती.
संबंधित बातम्या:
देशातले सर्व विमानतळं अदानी समूहाकडे? केंद्र सरकारनं काय दिलं उत्तर? वाचा,
‘महाराजा’साठी कोण बोली लावणार? हिंदूजा, टाटा की अदानी?
मुंबई विमानतळ अखेर अदानी समूहाच्या ताब्यात, देशातील 4 विमानतळांवर नियंत्रण