Work from Home : घरातून काम करणाऱ्यांना दिलासा; 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्षभर वर्क फ्रॉम होम करता येणार
आयटी आणि आयटीशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्षभर घरातूनच काम (Work from Home) करता येणार आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या वतीने त्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे.
मुंबई : देशावर गेले दोन वर्ष कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) सर्व उद्योगधंदे ठप्प असल्याने कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला. अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. तर कोरोना काळात कंपनीत जाणे शक्य नसल्याने अनेकांना वर्क फ्रॉम होम (Work from Home) देण्यात आले. आता कोरोनाचे संकट ओसरले आहे.परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफीसला बोलावण्यास सुरुवात केली आहे. मात्र आयटी आणि आयटीशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्षभर घरातूनच काम करता येणार आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या वतीने त्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. नव्या धोरणानुसार आयटी आणि आयटीशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्रातील पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करता येणार आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार सुविधेचा लाभ
वर्क फ्रॉम होममध्ये असमानता होती. त्यामुळे भारतातील आयटी आणि आयटीशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्रासाठी वर्क फ्रॉम होमचे नियम सारखेच असावेत, त्यामध्ये तफावत असू नये यासाठी नवे धोरण तयार करण्यात यावे अशी मागणी वाणिज्य विभागाकडे करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर वाणिज्य विभागाकडून वर्क फ्रॉर्म होममध्ये समानता आणण्यासाठी 43 अ हा नियम बनवण्यात आला आहे. या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला काही कारणांमुळे ऑफीसला येणे शक्य नसल्यास तो घरून देखील काम करू शकतो. या सुविधेचा लाभ हा कंत्राटी कर्मचाऱ्याला देखील मिळणार आहे.
आजारपणात 90 दिवसांची सुटी
विशेष म्हणजे जे कर्मचारी आधीपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत, ते आजारी असल्यास त्यांना 90 दिवसांची सुटी देखील मिळणार आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व सोईसुविधा पुरवण्यात याव्यात असे आदेश देखील कंपन्यांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील वर्षभर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येणार आहे.