डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला… काय आहेत नेमकी कारणं?
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. साहजिकच याचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर होत आहे. काही काळापासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 77 वर तग धरुन आहे. तर सध्या तो 75.5 वर जाउन पोचला असून कच्च्या तेलाच्या किमतींचा त्यावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
नवी दिल्लीः साधारणत: रोजच कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. क्रुडच्या दरात (Crude oil) वाढ होत असल्याने साहजिकच डॉलरच्या तुलनेत रुपयाची (Rupee) घसरणही सुरुच आहे. बुधवारीदेखील डॉलरच्या तुलनेत रुपयात 17 पैसे घसरण बघायला मिळाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने जगभरातील बजेट कोलमडले आहे. त्याची सर्वाधिक झळ ही भारतासारख्या तेलावर अवलंबून असलेल्या देशांना बसत आहे. देशासह जगभरात महागाईचा दर वाढला आहे. भारतातदेखील महागाईने कळस गाठला असताना दुसरीकडे बँकांच्या व्याजदरात होत असलेल्या वाढीमुळे महागाईत (Inflation) अधिकच भर पडत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून भारतीय रुपयादेखील घसरत आहे. दरम्यान, शेअर बाजार सध्या सावरत असल्याने रुपयाची पडझड काहीशी कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे. नाहीतर रुपयाची यापेक्षा जास्त घसरण होउ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. गेल्या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 76.5 वर होता.
आजचे मार्केट अपडेट असे :
करंसी मार्केट उघडले तेव्हा डॉलरच्या तूलनेत रुपयो 75.65 वर होता. गुंतवणूकदारांनी जोखीम असलेले एसेटची विक्री केल्यानंतर मात्र डॉलरच्या तुलनेत रुपया काहीसा घसरला होता. दिवसभरात रुपया 75.97 या उच्च व 75.62 या निच्च स्तरावर पोहचला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा 35 च्या कक्षेतच व्यवहार झालेला पहायला मिळाला. कालच्या बाजार बंदच्या तुलनेत रुपयात 17 पैसे घसरण होत तो 75.90 वर बंद झाला. तर दुसरीकडे डॉलर इंडेक्सदेखील 0.42 टक्के घसरणीसह 98.02 पर्यंत जावून पोहचला.
काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे :
तज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारी वाढ ही भारतीय रुपयाच्या घसरणीला प्रमुख कारणीभूत आहे. तसेच भारतीय शेअर बाजाराने काही काळ रुपयाला सावरण्यास मदतही केली परंतु कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारी सलग वाढ ही घसरण रोखू शकली नाही. शिवाय पुढील काही काळासाठी रशिया व युक्रेन यांच्या वादाचेदेखील पडसाद भारतीय रुपयावर पहायला मिळतील असे बोलले जात आहे. एलकेपी रिसर्चचे सिनिअर रिसर्चर जतिन त्रिवेदी यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतींचा प्रभाव रुपयावर राहणार आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत जसे चढ-उतार पहायला मिळतील तसेच चढ-उतार रुपयातदेखील बघायला मिळतील. कच्चे तेल जर 100 ते 115 डॉलरच्या दरम्यान राहिले तर रुपयादेखील डॉलरच्या तुलनेत 75.50, 76.25 असा राहिल. दरम्यान, ब्रेंट क्रुडची किंमत पुन्हा 110 डॉलर प्रतिबॅरल पोहचली आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस चांगला ठरला आहे. मंगळवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 35 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले आहे.
संबंधित बातम्या
समुद्रातून बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करताना दोन बोटी जप्त; 11 लाखाचे डिझेल घेतले ताब्यात
Virar Worker Death : विरारमध्ये तिसऱ्या मजल्यावर पत्र्याचे शेड मारताना मजुराचा पडून मृत्यू