सुरक्षित गुंतवणुकीचा ‘साथी’दार: सेबीचं डिजिटल पाऊल, नवं अॅप लवकरच मराठीत!
सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध असणारे ‘साथी’ अॅप आगामी काळात भारतातील सर्व प्रादेशिक भाषेत उपलब्ध होणार आहे. गुंतवणुकदारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
नवी दिल्ली: तुम्ही मोबाईलद्वारे शेअर्स ट्रेडिंग (SHARES TRADING) करत असल्यास तुमच्यासाठी महत्वाची बातमी. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने नव्या अॅपची घोषणा केली आहे. वैयक्तिक ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे सर्व अपडेट एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी ‘साथी’ (Saa₹thi) अॅप लाँच केले आहे. सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध असणारे ‘साथी’ अॅप आगामी काळात भारतातील सर्व प्रादेशिक भाषेत उपलब्ध होणार आहे. गुंतवणुकदारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मोठ्या प्रमाणात फोनच्या सहाय्याने व्यवहार केले जात आहे. त्यामुळे नवीन गुंतवणुकदारांना ट्रेडिंगची कार्यवाही सोयीस्कर व्हावी व गुंतवणुकीचं मुलभूत ज्ञान प्राप्त व्हावं हा ‘साथी’च्या निर्मितीमागील उद्देश असल्याची माहिती ‘सेबी’ (SEBI) सूत्रांनी दिली आहे. केवायसी प्रक्रिया, म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील महत्वाचे अपडेट्स, गुंतवणुकदारांच्या तक्रारींचे समाधान आदी बाबी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
उदंड झाले ‘अॅप’!
सध्या बाजारात शेअर्स ट्रेडिंगचे उदंड अॅप उपलब्ध आहेत. अॅपचे प्रमाणीकरण न करता वापरल्यास आर्थिक फसवणूक होण्याचा धोका नाकारता येत नाही. कोविड काळात लॉकडाउनमुळे सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. त्यामुळे मिळालेल्या व्यक्तिगत वेळेचा वापर करुन शेअर्स बाजारात मोठ्या प्रमाणात ट्रेड अकाउंट उघडण्यात आले. यामध्ये नवख्या गुंतवणुकदारांची संख्या सर्वाधिक आहे.
माहितीचा अधिकृत स्त्रोत:
ट्रेडिंगसाठी सध्या प्ले स्टोअरवर मोठ्या प्रमाणात अॅप उलब्ध आहेत. व्यक्तिगत माहिती तसेच पॅन किंवा बँक खाते, क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती प्राप्त करून वापरकर्त्यांच्या खात्यावर हल्ला मारण्याच्या घटना यापूर्वी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. सेबीने अधिकृत अॅप जारी केल्याने अधिकृत माहितीचा मुख्य स्त्रोत वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.
‘सेबी’ नेमकं काय करते?
सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था आहे. कंपन्या आणि संस्था यांना शेअर्स-डिबेंचर्स विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करणे तसेच गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण करणे सेबीचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. सेबीद्वारे व्यवहार करणाऱ्यांसाठी आवश्यक,योग्य व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातात.
इतर बातम्या:
शेअर बाजारात घसरणीचे सत्र: सेन्सेंक्समध्ये 656 अंकांची घसरण, निफ्टी 18 हजारांखाली