SHARE MARKET : खरेदीदारांनी सावरला बाजार, सेन्सेक्स 15 अंकांनी वधारला; निफ्टीत तेजी
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सर्वाधिक खरेदी एम अँड एम, रिलायन्स आणि डॉ. रेड्डी मध्ये दिसून आली. तर सर्वाधिक विक्रीचा जोर टायटन, एशियन पेंट आणि बजाज फिनसर्व्ह मध्ये राहिला.
नवी दिल्ली : जागतिक अर्थकारणातील संमिश्र घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) दिसून आला. आजच्या व्यवहारादरम्यान तेजी-घसरणीचं चित्र राहिलं. बँकिंग (Banking), फायनान्शियल्स शेअर्समध्ये विक्रीचा जोर राहिल्यानं सेन्सेक्स व निफ्टीमध्ये (Sensex and Nifty) घसरण झाली. रिलायन्स स्टॉक्स, मेटल आणि ऑईल व गॅस शेअरमधील खरेदीमुळं बाजार सावरला. सेन्सेक्स 17 आणि निफ्टी 32 शेअर्सच्या वधारणीसह बंद झाले. आज (मंगळवार) सेन्सेक्स 16.17 अंकांच्या वाढीसह 53,177.45 आणि निफ्टी 18.15 अंकांच्या वाढीसह 15850.20 वर बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सर्वाधिक खरेदी एम अँड एम, रिलायन्स आणि डॉ. रेड्डी मध्ये दिसून आली. तर सर्वाधिक विक्रीचा जोर टायटन, एशियन पेंट आणि बजाज फिनसर्व्ह मध्ये राहिला.
वधारले-घसरले
आज सेन्सेक्स वर स्टेट बँक वगळता अन्य सर्व बँकिंग शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी वर बँक, फायनान्शियल्स सर्व्हिसेस, फार्मा, खासगी बँक वगळता अन्य निर्देशांक मजबूत झाले.
रुपयाची नीच्चांकी घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपया 78.79 च्या नीच्चांकी स्तरावर बंद झाला. आज रुपयांत दोन महिन्यांतील सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. आज रुपया 44 पैशांनी घसरला. विदेशी गुंतवणुकदारांच्या विक्रीचा ओघ आणि कच्च्या तेलाच्या किंमतीमधील भाववाढीचा थेट परिणाम रुपयाच्या किंमतीवर झाला. चालू महिन्यात रुपया 1 टक्के आणि चालू वर्षात आतापर्यंत 6 टक्क्यांनी घसरण नोंदविली गेली.ॉ
करेक्शनचा मूड?
ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत मार्केट करेक्शनची स्थिती राहील असा अंदाज अर्थजाणकारांनी वर्तविला आहे. फेडरल रिझर्व्ह सहित केंद्रीय बँकांद्वारे व्याजदरात वाढ, कच्च्या तेलाच्या बाजारपेठेवर मंदीचं सावट, यूक्रेन-रशिया विवादामुळं बाजारावर अस्थिरतेचे ढग निर्माण झाले आहेत.
बजाज बायबॅक प्लॅन?
वाहन निर्मितील क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बजाज ऑटोनं महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं 2500 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. 4,600 रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर 54.35 लाख शेअर्सची खरेदी करणार आहे. बजाज ऑटो खुल्या बाजारात शेअर बायबॅक करणार आहे. यापूर्वीच कंपनीनं दुचाकी वाहनांच्या किंमतीत दोन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे कंपनीनं हा निर्णय घेतला होता. सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीकडे 17,526 कोटी रुपयांचे कॅश सरप्लस होती. मार्च 2021 पर्यंत कंपनीची कॅश सरप्लस 17,689 कोटींवर पोहोचला होता.