45 हजारांची नोकरी सोडली, आता शेअर्समधून कोट्यधीश

| Updated on: Nov 20, 2024 | 6:49 PM

मेहनत केली की यश निश्चित मिळतं. अनेकदा खूप प्रयत्न अपयशी ठरतात. पण, सातत्य ठेवलं तर निश्चित यशाचा मार्ग गाठता येतो. एका भाजी विक्रेत्याच्या मुलाने 45 हजारांची सरकारी नोकरी सोडली आणि शेअर बाजारात प्रवेश केला. युट्युब व्हिडिओ पाहून ट्रेडिंग सुरू केलं. हा तरुण यशस्वी झाला आहे. वाचा यशोगाथा.

45 हजारांची नोकरी सोडली, आता शेअर्समधून कोट्यधीश
Follow us on

कमी वयात परिस्थितीसोबत झगडावं लागलं की मुलं यशाकडे आगेकुच करायला आपोआप शिकतात. धनदांडग्यांचे मुलं मार्गदर्शनासाठी पैसे मोजतात. तर तिकडे गरिबाची मुलं स्वत:च योग्य मार्गही शोधतात आणि यशही गाठतात. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एकेकाळी 45 हजार रुपयांची नोकरी करणारा हा मुलगा आज शेअर बाजारातून कोट्यवधी रुपयांची छपाई करत आहे. यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहून त्याला ट्रेडिंग करावसे वाटले. यानंतर त्यानं नोकरी सोडली आणि यातच पूर्णवेळ करिअर करण्याचा बेत आखला. पुढे तो निर्णय योग्यही ठरला, असं तुम्हाला वाटेल. पण, तसं नव्हतं. दिनेश किरोला असं आम्ही यशोगाथा सांगत असलेल्या या मुलाचे नाव आहे. स्टॉक बर्नर अशी आपली ओळख निर्माण करणारा दिनेश 24 वर्षांचा आहे. एवढ्या कमी वयात त्याची कमाई कोट्यवधींमध्ये आहे. जाणून घ्या कसा होता त्याचा प्रवास.

वडील भाजी विकायचे

उत्तराखंडमधील दिनेश किरोला याचे वडील भाजी विकायचे. दिनेश खेळात खूप चांगला होता. त्यामुळे 2018 मध्ये त्याला या कोट्यातून भारतीय सैन्यात जाण्याची संधी मिळाली. आपला प्रवास सांगताना तो म्हणाला, ‘वयाच्या 23 व्या वर्षी मी लष्करात भरती झालो होतो. 2020 मध्ये माझी एलओसीवर नियुक्ती झाली. मात्र, वैद्यकीय समस्येमुळे त्यावेळी शस्त्रबाळगण्यास परवानगी नव्हती. त्यावेळी मी सहकारी सैनिकांसाठी जेवण बनवायचो.’

शेअर बाजारात प्रवेश

एके दिवशी जवानांसाठी जेवण बनवून दिनेश किरोला मोबाईल पाहताना शेअर बाजाराचा युट्युबवर एक व्हिडिओ पाहिला. इथूनच त्याला शेअर बाजाराविषयी आवड निर्माण व्हायला लागली. त्याने विलंब न लावता डिमॅट खाते उघडले आणि शेअर बाजारात प्रवेश केला. तेव्हा त्याचा पगार 45 हजार रुपये होता.

आयपीओमध्ये नफ्यानंतर ट्रेडिंगला सुरुवात

पगारावर व्यवहार करणाऱ्या दिनेशने नफा कमावला तेव्हा त्याने आपले पैसे आयपीओमध्ये गुंतवले, जिथे त्याला दमदार परतावा मिळाला. नफा वाढू लागल्यावर त्याने 1 लाख रुपये घेऊन व्यवहार सुरू केला. पहिल्यांदा 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. ती वसूल करण्याच्या प्रक्रियेत नुकसान एक लाखांपर्यंत वाढले.

कर्जासह ट्रेडिंग

जेव्हा दिनेशला इक्विटी कॅशमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला, तेव्हा त्याने उच्च जोखीम पत्करली आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये उतरला. येथे त्याचे नुकसानच झाले. सर्वप्रथम त्याने 1 लाख रुपयांपासून 1.20 लाख कमावले, पण लोभ वाढला आणि संपूर्ण कमाई निघून गेली. यानंतर त्याने मित्रांशी खोटे बोलून काही पैसे उधार घेतले पण तोटा सुरूच राहिला. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेशने पर्सनल लोन घेऊन बाजारात पैसे गुंतवले पण त्याला तोटा सहन करावा लागला. एकेकाळी त्याचे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. अखेर कंटाळून शेअर बाजारापासून स्वत:ला दूर केले.

पुन्हा शेअर बाजारात पुनरागमन

जवळपास दोन ते तीन महिने शेअर बाजारापासून दूर राहिल्यानंतर दिनेश किरोला यानी पुन्हा एकदा पुनरागमन केले. त्याने दुसरे कर्ज घेतले आणि सुमारे दोन लाख रुपये घेऊन व्यवहार सुरू केला. यावेळी त्याचा नफा 20 लाख रुपयांवर पोहोचला. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला, मित्रांचे पैसे परत मिळाले आणि ट्रेडिंगला पूर्ण वेळ देण्याचे ठरविले. सततच्या चढ-उतारानंतर त्याला बाजाराची प्रत्येक युक्ती समजली. मग तो सैन्य सोडून पूर्णवेळ व्यापारी झाला. आज त्याच्या पोर्टफोलिओची किंमत दीड कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.