नवी दिल्ली : देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम हा कार उत्पादनावर होत असल्याचे, भारतामधील प्रमुख कार निर्मिती कंपनी मारूती सुझुकीने म्हटले आहे. देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच कार निर्मितीसाठी लागणार इतर कच्चा माला देखील महागल्याने येणाऱ्या काळात गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते, असा अंदाज कंपनीकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान कोरोना काळात वाहनांच्या निर्मितीमध्ये घट झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा वाहन निर्मिती पूर्वपदावर येत असल्याची माहिती देखील कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
बाजारात मारूतीच्या वाहनांना मोठी मागणी आहे, सध्या स्थितीमध्ये जवळपास 25 लाख गाड्यांची ऑर्डर पेंडिगमध्ये आहे. मात्र सेमी कंडक्टरचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहन निर्मितीवर परिणाम झाला आहे. ज्याप्रमाणात वाहनांची निर्मिती व्हायला हवी त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. परिणामी पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याचे कंपनी म्हटले आहे.
दरम्यान सेमीकंडक्टरसोबतच वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या इतर कच्च्यामालाची देखील किंमत वाढली आहे. मोठ्याप्रमाणात कच्चा माल हा बाहेरून आयात करण्यात येतो. आतंरराष्ट्रीय बाजारात किमंत वाढल्याने वाहन निर्मितीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भविष्यात गाड्यांच्या किमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकते असे संकेत देखील कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. कोरोना काळात उत्पादनावर मोठा परिणाम झाला होता. मात्र आता हळूहळू कोरोनाचे रुग्ण कमी होत असून, लसीकरणाला देखील वेग आला आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट न आल्यास थोड्याच दिवसात कंपनीचे उत्पादन हे कोरोनापूर्व स्थितीमध्ये पोहोचू शकते असे कंपनीने म्हटले आहे.