Stock Market: लोकसभा निवडणूक निकालाचा ‘या’ उद्योगसमुहाला सर्वांत मोठा फटका; शेअर्स कोसळले!
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आज देशाचा कौल कोणत्या पक्ष-आघाडीला आहे, हे स्पष्ट होणार आहे. त्यासोबतच पुढील चार महिन्यांत महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा कलही उघड होईल. सुरुवातीचे कल पाहता शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे.
लोकसभा निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कलांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम पहायला मिळतोय. सुरुवातीचे कल पाहता एका मोठ्या उद्योगसमुहाला चांगलाच फटका बसला आहे. शेअर मार्केटची सुरुवातच नकारात्मक झाली आणि अदानी ग्रुपचे शेअर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली होती. मात्र आता नेमक्या निकालाच्या दिवशी शेअर बाजाराने अनेकांनी निराशा केली आहे. सकाळी साडेनऊ वाजता निफ्टीमध्ये जवळपास 600 अंकांची घसरण होती. तर बँक निफ्टीमध्ये 1500 अंकांनी मोठी घसरण पहायला मिळाली. सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.
निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जवळपास 3 टक्क्यांची घसरण झाली आहे. अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांची घसरण, अदानी पॉवर 10 टक्के, अंबुजा सीमेंटमध्ये 10 टक्क्यांची घसरण, अदानी एंटरप्राइजेसमध्ये 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. LIC मध्ये 10 टक्के, HAL मध्ये 10 टक्क्यांच्या घसरणाची नोंद झाली आहे. रिलायन्समध्ये साडेचार टक्क्यांची घसरण झाली आहे.