महायुतीचा पायगुण, 5 मिनिटांत कमावले 8 लाख कोटी
शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी 5 मिनिटांत 8 लाख कोटी कमावले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच शेअर बाजार उघडला आणि सेन्सेक्स निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये दीड टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.
महायुतीच्या बंपर विजयाचा परिणाम आज शेअर बाजारावर अगदी स्पष्टपणे दिसून आला आहे. अहो, अवघ्या 5 मिनिटांत थोडाथोडका नव्हे तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल 8 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. सेन्सेक्स एक हजारांहून अधिक तेजीसह उघडला आणि 80 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीमध्ये 400 अंकांची वाढ पाहायला मिळाली.
महायुतीच्या विजयाचा परिणाम?
अदानी ग्रुप याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, SBI, L & T, ICICI बँकेच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. खरं तर महाराष्ट्रात महायुतीने बंपर विजय मिळवला आहे. ज्याचा परिणाम शेअर बाजारात स्पष्टपणे दिसून येत आहे.
शेअर बाजारात 1900 अंकांची वाढ
महायुतीने दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ज्याचा परिणाम धोरण वगैरेवरही दिसेल. शुक्रवारी शेअर बाजारात 1900 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती.
दोन्ही निर्देशांकांमध्ये दीड टक्क्यांहून अधिक वाढ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच शेअर बाजार उघडला आणि सेन्सेक्स निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये दीड टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स एक हजार अंकांच्या वाढीसह 80,193.47 अंकांवर उघडला. ट्रेडिंग सेशनदरम्यान 1300 अंकांची तेजी आली आणि 80407 अंकांसह दिवसभराचा उच्चांक गाठला. शुक्रवारी सेन्सेक्स 1900 अंकांच्या वाढीसह 79,117.11 अंकांवर बंद झाला.
गुंतवणूकदारांना 8 लाख कोटींचा फायदा
शेअर बाजारातील या तेजीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा नफा BSE च्या मार्केट कॅपशी निगडित असतो. आकडेवारीनुसार, BSE चे मार्केट कॅप शुक्रवारी 4,32,71,052.05 कोटी रुपये होते. हे सोमवारी वाढून 4,40,37,832.58 कोटी रुपये झाले. म्हणजेच BSE च्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सात लाख कोटी रुपयांहून अधिक फायदा झाला होता.
निफ्टीचाही वेगाने व्यवहार
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक निफ्टीही वेगाने व्यवहार करत आहे. निफ्टी सुमारे 350 अंकांच्या वाढीसह 24,253.55 अंकांवर उघडला आणि ट्रेडिंग सेशनदरम्यान 423 अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी 24330.7 अंकांवर पोहोचला. सध्या निफ्टी 388.80 अंकांच्या वाढीसह 24,296.05 अंकांवर व्यवहार करत आहे.
कोणत्या शेअर्समध्ये तेजी ?
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या शेअर्सबद्दल बोलायचं झाले तर बीपीसीएलच्या शेअर्समध्ये 5.70 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. तर BEL चे समभाग 4.68 टक्क्यांसह व्यवहार करताना दिसत आहेत.ONGC चे समभाग 4.13 टक्क्यांनी वधारले.
श्रीराम फायनान्सचा शेअर 3.84 टक्क्यांनी वधारला आहे. एल अँड टीच्या शेअरमध्ये 3.52 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजारात देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 2.25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. टाटा स्टीलचे समभाग 1.47 टक्के, टाटा मोटर्सचे 1.41 टक्के, SBI चे समभाग 3.38 टक्क्यांनी वधारले आहेत.