Stock Market : शेअर बाजारात तुफान, सेन्सेक्सची 1600 अंकांची झेप, या स्टॉकमुळे गुंतवणूकदार मालामाल
Share Market Rally : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुंतवणूकदारांना रडवणाऱ्या शेअर बाजाराने आता चांगलीच उभारी घेतली आहे. मंगळवारी शेअर बाजारात मंगल मंगल हो असे सूर आळवले गेले. सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात 1600 अंकांची झेप घेतली.

शेअर बाजारात शुक्रवारनंतर मंगळवारी मोठे तुफान आले. भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आज 1588 अंक वधारला. सेन्सेक्स 76,745.51 अंकावर व्यापार करत होता. तर निफ्टीमध्ये 471 अंकांची उसळी दिसून आली. निफ्टी 23,300.40 अंकावर व्यापार करत होता. निफ्टी बँकमध्ये सुद्धा जोरदार तेजी दिसून आली. हा निर्देशांक 1127 अंकांनी वधारून 52,130 अंकावर व्यापार करत आहे.
निफ्टी बँक आणि शेअर बाजारात तेजीमुळे गुंतवणूकदारांना शंभर हत्तीचे बळ मिळाले आहे. अनेक मोठ्या शेअरमध्ये मोठी उलाढाल दिसून आली. HDFC Bank च्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. तर ICICI बँकेचा शेअर 2.87 टक्क्यांनी वधारला. याशिवाय BSE टॉप 30 शेअरमधील 28 शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. नेस्ले आणि ITC स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. Tata Motors च्या शेअरमध्ये 5.28 टक्क्यांची तेजी दिसली. तर L&T आणि महिंद्रा आणि महिंद्राच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांच्या जवळपास तेजी दिसून आली.
टॅरिफ कार्डचा परिणाम




अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 70 देशांवर टॅरिफ लावले होते. या शुल्क वाढीमुळे जगभरात हाहाकार माजला होता. पण या व्यापार युद्धावर तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातील बाजारात तेजीचे सत्र आले आहे. भारतीय शेअर बाजारात ट्रम्प यांच्या निर्णयामुळे तेजीचे सत्र परतले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स 1.77 टक्क्यांच्या वाढीसह 75,157.26 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 429.40 अंक वा 1.92% वाढीसह 22,828.55 अंकावर बंद झाला होता.
बाजारात तेजीची कारणं काय?
भारतीय शेअर बाजारात गेल्या 5-6 महिन्यांपासून विक्रीचे सत्र सुरू आहे. या दरम्यान काही वेळा भारतीय शेअर बाजाराने उसळी पण घेतली. 2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी जगाभरातील देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय शेअर बाजार एका दिवसात 5 टक्क्यांहून अधिकने घसरला. तर आता ट्रम्प यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे जागतिक चिंता कमी झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याचा ही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे.