1 ऑक्टोबरपासून ‘या’ बँकेची ATM सेंटर्स बंद, ग्राहकांना पैसे कसे मिळणार?
सूर्योदय स्मॉल फायनान्शियल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सूचना जाहीर केली आहे. बँक आपली ऑटोमेटेड टेलर मशीन्स (ATM) बंद करणार आहे. बँकेने यासंदर्भात त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे.
नवी दिल्ली: सूर्योदय स्मॉल फायनान्शियल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सूचना जाहीर केली आहे. बँक आपली ऑटोमेटेड टेलर मशीन्स (ATM) बंद करणार आहे. बँकेने यासंदर्भात त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. उद्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून सूर्योदय स्मॉल फायनान्शियल बँकेची एटीएम सेवा बंद होणार आहे. ऑपरेशनल कारणांमुळे, सूर्योदय बँकेचे एटीएम 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद राहतील, असं सांगण्यात आलं आहे.
ग्राहक पैसे कसे काढणार?
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने त्यांची एटीएम सेंटर्स बंद केली तरी ग्राहक सूर्योदय बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डचा वापर इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये त्याच्या रोख रक्कम काढण्यासाठी करू शकतात. ग्राहक इतर बँकिंग सेवांसाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग (24X7) वापरू शकतात.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने गेल्या महिन्यात, शेअरहोल्डर्सना दिलेल्या त्यांच्या वार्षिक अहवालात बँकेच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली होती. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर बाबू म्हणाले की, बँक त्याच्या धोरणात्मक सहयोगांचा वापर करून वन स्टॉप सोल्यूशन बँक बनण्याची तयारी करत आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ही एक शेड्युल व्यावसायिक बँक आहे. त्यांनी NBFC म्हणून आपले काम सुरू केले होते. सूर्योदयने 2017 मध्ये स्मॉल फायनान्स बँक म्हणून कामकाज सुरू केले. देशभरातील 555 बँकिंग आऊटलेटद्वारे बँकेची 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँकेचे काम सुरु आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि ओडिशामध्ये बँकेचा चांगला व्यवसाय आहे.
बँकेला 48 कोटी रुपयांचा तोटा
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेला 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 48 कोटी रुपयांचे नुकसान झाले. कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेमुळे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेला कर्ज राइट-ऑफ, पुनर्रचनेची तरतूद आणि कमी वितरणामुळे हे नुकसान झाले. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत बँकेला 27 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
सध्या सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत बचत खाते उघडल्यावर तुम्हाला 6.25 टक्के पर्यंत व्याज दर मिळेल. यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक 4 टक्के व्याज दिले जात आहे. 1 लाख ते 10 लाख रुपयांच्या ठेवींवर 6.25 टक्के वार्षिक व्याज आहे. 10 लाखांपेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक 6 टक्के व्याज मिळेल.
इतर बातम्या:
स्टार्टअप कंपन्यांना अच्छे दिन येणार, स्टेट बँकेकडून कर्ज पुरवठ्यासाठी प्लॅनिंग सुरु
इंडसइंड बँकेचे सणांच्या आधी एक मोठे पाऊल, गोल्ड लोनसाठी इंडेल मनीशी करार
Suryoday Small Finance Bank ATM will shutdown from 1 October 2021