एअर इंडिया विक्रीचा व्यवहार अंतिम टप्प्यात, केंद्र सरकारकडून टाटा समूहाला लेटर ऑफ इंटेंट जारी
Air India | यानंतर समभाग खरेदीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील 15 दिवसांत पार पडेल. लेटर ऑफ इंटेट स्वीकारताना टाटा समूहाला 270 कोटी रुपयांची बँक गॅरंटी द्यावी लागेल. त्यानंतर पुढील सोपस्कार डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पार पडतील, असे तुहिन कांत पांडेय यांनी सांगितले.
नवी दिल्ली: टाटा समूहाला एअर इंडियामधील 100 टक्के भागविक्रीची पुष्टी करण्यासाठी सरकारने सोमवारी एक आशय पत्र जारी केले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. सरकारने गेल्या आठवड्यात टाटा समूहाच्या मालकीचा प्रस्ताव स्वीकारला होता. त्यानुसार टाटा सन्स 18000 कोटी रुपये मोजून एअर इंडिया खरेदी करेल. त्यापैकी 2,700 कोटी रुपये केंद्र सरकारला रोख मिळतील. तर एअर इंडियाच्या डोक्यावरील 15,300 कोटींचे कर्ज टाटा समूहाकडे वर्ग केले जाईल.
केंद्रीय निर्गुंतवणूक मंत्रालयाने टाटा समूहाला पाठवलेल्या लेटर ऑफ इंटेंटमध्ये एअर इंडियाच्या 100 टक्के भागविक्रीचा उल्लेख आहे. DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी म्हटले की, आज टाटा समूहाला लेटर ऑफ इंटेंट पाठवण्यात आले आहे. यानंतर समभाग खरेदीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील 15 दिवसांत पार पडेल. लेटर ऑफ इंटेट स्वीकारताना टाटा समूहाला 270 कोटी रुपयांची बँक गॅरंटी द्यावी लागेल. त्यानंतर पुढील सोपस्कार डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पार पडतील, असे तुहिन कांत पांडेय यांनी सांगितले.
LOI issued to the successful bidder in the strategic disinvestment transaction of AI. SPA will be signed soon. pic.twitter.com/6joroBqbnC
— Secretary, DIPAM (@SecyDIPAM) October 11, 2021
एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूह 15 हजार कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता
टाटा समूह एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी सिंडिकेटेड कर्जाद्वारे 15,000 कोटी रुपयांपर्यंत उभारू शकतो. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार कर्जाची मॅच्युरिटी तीन वर्षांची असेल आणि व्याजदर 7 टक्के असेल. या प्रस्तावित सिंडिकेटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) प्रमुख बँकर असू शकते. कारण एसबीआयने बोली लावण्यासाठी आवश्यक बँक हमी आधीच दिली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा समूह काही परदेशी बँका आणि निवडक स्थानिक बँकांशीही चर्चा करत आहे. परदेशी बँकांमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी, ड्यूश, जेपी मॉर्गन आणि बार्कलेज यांचा समावेश आहे. संबंधित बँका आणि एसबीआयने अद्याप या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.
एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा सन्सकडून सल्लागार समिती
टाटा सन्स एअर इंडियाच्या अधिग्रहणापूर्वी थोड्या काळासाठी सल्लागार समिती तयार करत आहे. यात टाटा सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. तसेच संचालक मंडळाचे सदस्य, हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि एअर इंडियाचे काही उच्च अधिकारी असतील. ईटीच्या अहवालानुसार, एअर इंडियाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.
‘एअर इंडियाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल’
तब्बल 18000 कोटी रुपये मोजून अखेर टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी केली आहे. त्यामुळे 68 वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात आली. मात्र, एअर इंडियाची सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात या कंपनीला रुळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल, असे मत रतन टाटा यांनी व्यक्त केले.
सध्याच्या घडीला एअर इंडियाच्या डोक्यावर तब्बल 15000 कोटींचे कर्ज आहे. याशिवाय, भारतातील हवाई सेवा क्षेत्रात एअर इंडियाला अनेक खासगी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचा गाडा पुन्हा रुळांवर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील. त्यासाठी देशातील हवाई सेवा क्षेत्राकडून टाटा समूहाला सहकार्य मिळण्याची गरज असल्याचे रतन टाटा यांनी म्हटले. टाटा समूहाने एअर इंडियाला 18000 कोटींमध्ये खरेदी केले आहे. या कराराअंतर्गत टाटा समूह विमान कंपनीचे 15300 कोटी रुपयांचे कर्ज फेडेल आणि सरकारला 2700 कोटी रुपये रोख म्हणून मिळतील.
संबंधित बातम्या
मोदी सरकारनं एअर इंडिया टाटांना विकली, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे काय? पगार आणि भत्ते किती मिळणार?
मोठी बातमी, एअर इंडियाची मालकी अखेर टाटा समूहाकडे, मंत्री गटाचं शिक्कामोर्तब