छत्रपती संभाजीनगर, चाकणमध्ये Tesla ची इलेक्ट्रिक कार तयार होणार? पंतप्रधान मोदी आणि एलॉन मस्क यांच्यात काय झाला संवाद
Tesla Plant Chhatrapati Sambhajinagar : पुण्यातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगजगतासाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्याचा मोठा फायदा या दोन औद्योगिक शहरांना होणार आहे.

पुण्यातील चाकण आणि देशातील मोठे औद्योगिक शहर छत्रपती संभाजीनगरातील उद्योगविश्वासाठी अमेरिकेतून आनंदवार्ता येऊन धडकली आहे. मराठवाड्याच्या सांस्कृतिक राजधानीत ऑरिक सिटी, वाळूज, बजाजनगर, चित्तेगाव, चिकलठाणा, शेंद्रा पंचतारांकित असा उद्योगजगताचा पसारा वाढत आहे. त्यात जागतिक कंपन्यांची भर पडत आहेत. या मालिकेत आता जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी टेस्लाची भर पडण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्याचा मोठा फायदा या दोन औद्योगिक शहरांना होणार आहे.
काय झाली चर्चा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक अब्जाधीश आणि टेस्लाचा सीईओ एलॉन मस्क यांच्यात आज, 18 एप्रिल रोजी दूरध्वनीवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी या चर्चेची माहिती त्यांच्या सोशल मीडिया एक्सच्या अधिकृत हँडलवरून दिली आहे. यावर्षी मोदी आणि मस्क यांच्यात वॉशिंग्टन येथे बैठक झाली होती. त्यावेळी जे मुद्दे चर्चिले गेले होते. त्यासह इतर मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मोदींनी दिली. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रयोग या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन भागीदारीबाबत चर्चा झाली. भारत या क्षेत्रात अमेरिकेसोबत भागीदारीसाठी वचनबद्ध आहे.




यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी ब्लेअर हाऊसमध्ये मस्क आणि मोदी यांच्यात बैठक झाली होती. यावेळी मस्क हे त्यांची तीन मुलं एक्स, स्ट्राईडर आणि एज्योरसह पोहचले होते. यावेळी नाविन्यपूर्ण कल्पना, अंतराळ संशोधन आणि टेस्लाच्या भारतातील विस्ताराबाबत चर्चा झाली होती.
राज्यातील दोन शहरांना लॉटरी
Tesla भारतात एंट्रीसाठी इच्छुक आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहन बाजाराला भरते आले आहे. त्यामुळे टेस्लाला भारतीय बाजारपेठेत एंट्री करायची आहे. कंपनीला अनेक सवलती आणि आयात शुल्कात सवलत हवी आहे. त्यासाठीच्या योजनेतंर्गत कंपनी केंद्र सरकारकडे अर्ज दाखल करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर आणि गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.
पुण्यात कंपनीचे ऑफिस
टेस्लाने 2019 मध्ये बेंगळुरुत त्यांच्या भारतातील सहायक कंपनीची नोंदणी केली होती. भारतात इलेक्ट्रिक वाहन आणि ईव्ही बॅटरी तयार करण्यासाठी एक कारखाना सुरु करण्याची योजना होती. भारतात इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेशासाठी टेस्लाचे प्रयत्न सुरु आहेत. टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पुण्यात पंचशील बिझनेस पार्कमध्ये कार्यालय (Elon Musk Tesla Office) थाटणार आहे. त्यासाठी त्यांनी भाडे तत्वावर कार्यालय पण घेतले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांशी चर्चेनंतर टेस्लाने हे पाऊल टाकले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे भारतात इलेक्ट्रिक कार निर्मिती आणि विक्रीबाबत टेस्ला आग्रही असल्याचे स्पष्ट होते.