success Story : 20 वेळा नापास; या व्यक्तीने कशी उभी केली ५०० कोटी रुपयांची कंपनी
परंतु, त्यांनी हिंमत हरली नाही. स्वतःवर भरोसा ठेवला. आता त्यांनी मेहनत करून ५०० कोटी रुपयांची कंपनी उभी केली.
नवी दिल्ली : कोणताही यशस्वी व्यक्ती आपल्या अपयशाने निराश होत नाही. अपयशावर मात करून तो यशाच्या मागे जातो. हॅपिलोचे संस्थापक आणि सीईओ विकास डी. नाहर असेच एक व्यक्ती. त्यांना २० वेळा अपयशाचा सामना करावा लागला. परंतु, त्यांनी हिंमत हरली नाही. स्वतःवर भरोसा ठेवला. आता त्यांनी मेहनत करून ५०० कोटी रुपयांची कंपनी उभी केली.
आता आपण हॅपिलो कंपनीच्या यशाबद्दल पाहणार आहोत. विकास डी. नाहर हे बिझनेस रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये दिसले होते. हा शो उद्योजकांना पुढे येण्यास मदत करतो. नाहर यांची कंपनी पौष्टिक अन्न तयार करते. यात ड्रायफ्रूट प्रमुख आहे.
१० हजार रुपयांत सुरू केली हॅपिलो
विकास डी. नायर यांनी एका व्हिडीओमध्ये सांगितले की, त्यांना किती संघर्ष करावा लागला. त्यांनी खूप चढाव-उतार पाहिले. नाहर यांनी फक्त १० हजार रुपयांत कंपनीची सुरुवात केली होती. कंपनीत फक्त दोन जण काम करत होते. आता त्यांची कंपनी देशातील ई-कॉमर्स प्लॅटफार्मवर दिसते. रिटेल स्टोअर्समध्येही त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट दिसतात. १० हजार रुपयांची कंपनी आता ५०० कोटी रुपयांची झाली आहे.
कोण आहेत विकास नाहर?
विकास नाहर हे शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे कुटुंब काळी मिरची आणि कॉफीची शेती करते. यामुळे लहानपणापासून त्यांना व्यवसायात रुची होती. विकास नाहर हे कम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर आहेत. जैन गृपसोबत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून एमबीए करण्यासाठी त्यांनी ब्रेक घेतला. एमबीए झाल्यानंतर नाहर हे मॅनेजींग डायरेक्टर म्हणून सात्विक स्पेशालिटी फूड्ससोबत जुळले. येथे काम केल्यांतर त्यांना चांगला अनुभव मिळाला. या अनुभवाचा फायदा त्यांनी हॅपिलो स्थापन करण्यासाठी वापरला.
२०१६ मध्ये हॅपिलोची स्थापना
विकास नाहर यांनी २०१५ मध्ये सात्विक स्पेशालिटी फूड्स सोडलं. त्यानंतर एका वर्षाने २०१६ मध्ये हॅपिलोची स्थापना केली. हॅपिलो ही हेल्दी स्नॅक्स कंपनी आहे. आता ही कंपनी ४० प्रकारचे ड्रायफ्रूट्स तयार करते. याशिवाय यांची कंपनी १०० प्रकारचे चॉकलेट्स आणि ६० प्रकारचे मसाले तयार करते.