एक तासात ही पालटू शकते नशीब, मुहूर्त ट्रेडिंगमध्ये करा कमाई
Diwali Muhurat Trading | मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती आवश्यक आहे. दिवाळीच्या अति उत्साहात ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला मोठा फटका बसेल. अशी गुंतवणूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. अशा शुभ दिनी तुम्हाला नाहकचा भूर्दंड सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा...
नवी दिल्ली | 11 नोव्हेंबर 2023 : दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या काळात भारतीय शेअर बाजार एक तासासाठी उघडला जातो. या एक तासात ट्रेडिंग होते. त्यालाच मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. मुहूर्त ट्रेडिंगविषयी (Muhurta Trading) नवीन गुंतवणूकदारांना उत्सुकता असते. त्यांना पण या दिवशी कमाई करण्याचा मोह आवरत नाही. त्यांना या दिवशी बक्कळ कमाई करायची असते. एकतर दिवाळीचा उत्साह असतो. या उत्साहाच्या भरात विचार न करता धडाधड स्टॉक खरेदी-विक्री करण्यात येते. पण मुहूर्त ट्रेडिंगला फायदाच होतो असे नाही, त्यामुळे योग्य स्टॉकची निवड करणे आवश्यक असते. तसेच मोहाला पण आवर घालावी लागते. नवीन गुंतवणूकदारांनी या एक तासात योग्य नियोजन केल्यास त्याचे आर्थिक नुकसान टळते.
आर्थिक उद्दिष्ट्य
मुहूर्त ट्रेडिंग सत्रात गुंतवणूक करताना या गोष्टीचे भान ठेवावे लागते की, तुमचे आर्थिक उद्दिष्ट काय आहे. म्हणजे शेअर बाजारात या एक तासात कोणत्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक कराल. किती काळासाठी ही गुंतवणूक करायची हे लक्षात घ्या. तुमची गुंतवणूक लाँग टर्म, मिड टर्म अथवा शॉट टर्म यापैकी कशासाठी आहे हे लक्षात घ्या. त्यानंतरच एक तासात गुंतवणूक करा.
कंपनीचे शेअर खरेदी करताना राहा चोखंदळ
जर तुम्ही मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर खरेदी करत असाल तर ज्या कंपन्याची स्थिती मजबूत आहे. फंडामेंटल जोरदार आहे. त्या कंपन्यांचा शोध घ्या. त्यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय ठरु शकतो. तसेच ज्या कंपन्यांचे रिपोर्ट चांगले आहेत. भविष्याच ज्या कंपन्या दमदार कामगिरी करणार आहेत, अशा कंपन्या निवडा. त्यांची मागाली कामगिरी तपासा. या कंपन्यांविषयी तज्ज्ञांची मते जाणून घ्या. त्यांच्यात गुंतवणूक करा.
पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवा
पोर्टफोलिओत केवळ एकाच सेगमेंटमधील कंपन्यांची भरती करु नका. त्यात वैविध्य ठेवा. वेगवेगळ्या सेगमेंटमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा. समजा तुमच्याकडे 50,000 रुपये असतील तर त्यातील एक निश्चित रक्कम अनेक सेक्टरमध्ये गुंतवा. त्यामुळे बाजार घसरला तरी सर्वच शेअर एकदम खाली येणार नाही. नुकसान टळेल.
या तारखेला मुहूर्त ट्रेडिंग
दिवाळीचा मुहूर्त ट्रेडिंग 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7.15 या वेळेदरम्यान होईल. मुहूर्त ट्रेडिंग दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक्सचेंजद्वारे आयोजीत करण्यात येणारे विशेष व्यापारी सत्र आहे. हे प्रतिकात्मक व्यापारी सत्र दरवर्षी आयोजीत करण्यात येते. यात मोठ्या संख्येने मोठे गुंतवणूकदार, ब्रोकर्स, किरकोळ गुंतवणूकदार हे सहभागी होतात.