Microsoft | गंटागळ्या खाणाऱ्या मायक्रोसॉफ्टला असे तारले या भारतीयाने, आज आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Microsoft | बाजारातील भांडवला आधारे मायक्रोसॉफ्ट जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ भारतीय वंशाचे सत्या नडेला हे आहेत. त्यांना CNN बिझनेसने गेल्यावर्षी सीईओ ऑफ द इअर म्हणून निवडले. नडेला इंजिनिअर म्हणून मायक्रोसॉफ्टशी जोडल्या गेले. आज ते कंपनीचे चेअरमन आहेत.
नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2024 : अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुळ भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांना गेल्या वर्षीचा सीईओ ऑफ द इअर हा सन्मान मिळाला. या स्पर्धेत Chase चे सीईओ जॅमी डायमन, OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन आणि Nvidia चे सीईओ जेनसन हुआंग यांचा समावेश आहे. भारतीय वंशाचे सत्या नडेला यांनी एआय, या कृत्रिम बुद्धीमतेवर काम करणाऱ्या तंत्रज्ञानावर अब्जावधी डॉलर खर्च केले आहे. त्यांच्या तालमीत मायक्रोसॉफ्टला पुन्हा ताकद मिळाली आहे. कंपनीने गतवैभव मिळवले आहे. त्यांच्यामुळेच मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये 55 टक्क्यांची तेजी दिसून आली.
हैदराबादमध्ये झाला जन्म
सत्य नडेला यांचा जन्म हैदराबादमध्ये 1967 मध्ये झाला. त्यांचे वडील एक प्रशासकीय अधिकारी होते तर आई ही संस्कृतची प्राध्यापिका होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथील शाळेत झाले.1988 मध्ये त्यांनी मनिपाल इन्स्टिंट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कम्प्यूटर सायन्समध्ये एमएस करण्यासाठी ते अमेरिकेत दाखल झाले. त्यांनी 1996 मध्ये शिकागो येथील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.
अशी झाली करिअरची सुरुवात
शिक्षण पूर्ण झाल्यावर सत्या नडेला यांनी सन मायक्रोसिस्टिम्स या कंपनीत तंत्रज्ञान विभागात नोकरी सुरु केली. 1992 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये ते रुजू झाले. तेव्हापासून ते याच कंपनीत काम करत आहेत. त्यांना या दीर्घ प्रवासात कंपनीच्या विविध प्रकल्पात काम केले आहे. सुरुवातीला सर्व्हर ग्रुपमध्ये ते रुजू झाले होते. त्यानंतर सॉफ्टवेअर विभाग, ऑनलाईन सेवा, संशोधन आणि विकास, जाहिरात अशा प्लॅटफॉर्मवर त्यांनी सक्रियपणे काम केले.
सत्य नडेला, क्लाऊड गुरु
सत्य नडेला यांना क्लाऊड गुरु म्हणून पण ओळखले जाते. मायक्रोसॉफ्टमध्ये क्लाऊड कम्युटिंगचे नेतृत्व त्यांनी केले. कंपनीला जगातील सर्वात मोठे क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमधील एक करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये बिझनेस डिव्हिजनमध्ये उपाध्यक्ष पदावर काम केले. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे डेटाबेस, विंडोज सर्व्हर आणि डेव्हलपर टूल्सला मायक्रोसॉफ्ट अज्योर क्लाऊड प्लॅटफॉर्मवर आणण्यात त्यांनी मोठी भूमिका निभावली.