टाटाची ही कंपनी करणार शेअर बायबॅक, गुंतवणूकदारांची होईल कमाई
Tata Share Buyback | टाटा हा ब्रँड अनेकांच्या विश्वासावर आतापर्यंत खरा उतरला आहे. या ब्रँडवर अनेक ग्राहक, गुंतवणूकदार फिदा आहेत. टाटा समूहातील ही कंपनी आहेत शेअरचे बायबॅक करणार आहे. त्यामुळे या कंपनीवर गुंतवणूकदारांचा विश्वास अजून वाढेल. त्यात त्यांचा मोठा फायदा होणार आहे. या कंपनीने यापूर्वी पण शेअर बायबॅक केले आहेत.
नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : जर तुमच्याकडे टाटा समूहातील या कंपनीचे शेअर असतील तर या दिवाळीत आनंद साजरा करण्याचा आणखी एक क्षण तुम्हाला मिळाला आहे. तुम्हाला या कंपनीचे शेअर चांगल्या भावात विकण्याची आयती संधी आली आहे. स्वतः कंपनीच हे शेअर खरेदी करणार आहे. या कंपनीने शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. ही कंपनी कोट्यवधी रुपयांचे शेअर बायबॅक करण्याच्या तयारीत आहे. अर्थात या कंपनीने ही कवायत काही पहिल्यांदा केलेली नाही. या कंपनीने यापूर्वी चार वेळा तिचेच शेअर खरेदी केले आहे. त्यात गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारखेची पण घोषणा केली आहे.
17,000 कोटी रुपयांचे शेअर
तर ही कंपनी टीसीएस आहे. कंपनी तिचे बाजारातील शेअर पुन्हा खरेदी करणार आहे. 17,000 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्याची योजना कंपनीने तयार केली आहे. कंपनी या बायबॅकसाठी 25 नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. याविषयीची माहिती बुधवारी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली. बायबॅकमध्ये कंपनी खुल्या बाजारातून शेअरधारकांकडून स्वतःचेच शेअर खरेदी करते.
शेअरमध्ये तेजीचे सत्र
टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसचा शेअर बुधवारी बीएसईवर 2.03 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 67.60 रुपयांनी वधारुन 3399.30 रुपयांवर बंद झाला. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 3,680 रुपये आहे. तर 52 आठवड्यातील निच्चांक 3,070 रुपये आहे. बीएसईवर बुधवारी कंपनीचे बाजार भांडवल 12,43,821 कोटी रुपये होते. बायबॅकची रेकॉर्ड डेट जवळ येताच टीसीएसच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले.
गुंतवणूकदारांचा वाढेल भरवसा
कंपनी जेव्हा शेअर बायबॅक करते. तेव्हा गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. गुंतवणूकदारांना कंपनीच्या आर्थिक क्षमतेचा अंदाज येतो आणि कंपनीवरील भरवसा वाढतो. येत्या काळात टीसीएसची कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे. गेल्या 1 महिन्यात या शेअरने 3.54 टक्क्यांचा निगेटिव्ह रिटर्न दिला आहे.
काय आहे बायबॅक प्राईस
कंपनीने 11 ऑक्टोबर रोजी शेअर बायबॅकची घोषणा केली होती. कंपनीने एक रुपये दर्शनी मूल्याच्या 4,09,63,855 पूर्ण देय इक्विटी शेअरला 4,150 प्रति शेअरच्या दराने बायबॅक करण्याची घोषणा केली आहे. टीसीएसने यापूर्वी पण शेअर बायबॅक केले आहे. गेल्या 6 वर्षांत टीसीएस कंपनीने पाचव्यांदा शेअर बायबॅक केले आहेत.
कंपनीच्या नफ्यात वाढ
कंपनीच्या तिमाही निकालाने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 11,432 कोटी रुपयांचा जोरदार नफा झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 8.7 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.