भारतातील प्रत्येक घरात ‘टपरवेअर’ कंपनीचा एकतरी डबा किंवा बाटली तुम्हाला आवर्जून आढळणार. ‘टपरवेअर’चे डबे महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. रसरशीत भाजी किंवा डाळसुद्धा जराही बाहेर न सांडता या डब्ब्यांमध्ये व्यवस्थित राहतात. त्याचप्रमाणे ते इथे-तिथे नेण्यासाठीही सहज असतात, त्यामुळे असंख्य महिलांची ‘टपरवेअर’च्या डब्यांना खूप पसंती मिळाली. टपरवेअरचे डबे ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी विसरल्यावर अनेकांनी घरच्यांची नको नको ती बोलणी सहन केली असेल. एक काळ असा होता जेव्हा गृहिणी एखाद्या वेळी आपला स्वत:चा वाढदिवस विसरतील पण आपल्या घरातील टपरवेअरचे डबे कधी आणि कोणाला दिलेत, हे ते विसरणार नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर घर आणि बाजारपेठ ही दोन्ही ठिकाणी ‘टपरवेअर’च्या वस्तूंनी बघता बघता काबीज केली. गृहिणींच्या मनावर तर अधिराज्य वगैरे म्हणतात ते गाजवायलाही या ‘टपरवेअर’नं सुरुवात केली. त्यामुळे मुंबईतल्या खचाखच गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये लोंबकळत जाणाऱ्या प्रवाशांपासून ते शेकडो खोल्यांच्या महालात इंग्लंडमध्ये राहणऱ्या राणी एलिझाबेथ यांच्यापर्यंत सगळ्यांमध्येच ‘टपरवेअर’ लोकप्रिय ठरू लागलं. घराघरात प्रचंड लोकप्रिय असलेली ही कंपनी आता दिवाळखोरीत निघाली आहे.
या कंपनीच्या विक्रीत लक्षवेधी घट झाली असून ‘टपरवेअर’वर आता जवळपास 70 कोटी डॉलरचं (जवळपास 5860 कोटी रुपये) कर्ज आहे. कर्ज चुकवण्यात अपयशी ठरलेल्या या कंपनीने आता आपल्या काही सहाय्यक कंपन्यांसोबत अमेरिकेत दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार टपरवेअरचं जाळं सुमारे 70 हून अधिक देशात विस्तारलेलं होतं.
अर्ल टपर (Earl Tupper) या अमेरिकेतल्या हरहुन्नरी उद्योजक आणि शास्त्रज्ञाने 1946 साली हे नवं प्लास्टिक विकसित केलं. त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना त्यांनी आपल्याच नावावरून ‘टपरवेअर’ असं नाव दिलं. त्यावेळी दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. त्यामुळे साठवणीच्या वस्तूंची प्रचंड गरज होती. टपर यांनी सुरुवातीला या नव्या दर्जाच्या प्लास्टिकपासून इंजेक्शनची सीरिंज बनवली होती. त्याला खूप मागणी मिळाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी इतर डबे आणि बाटल्या बनवायला सुरुवात केली. हवाबंद झाकण हे ‘टपरवेअर’चं वैशिष्ट्य ठरलं. गेल्या 78 वर्षांपासून सर्वसामान्यांपासून मोठमोठ्या लोकांच्या घरांमध्ये बंद-उघड होत असलेले हे टपरवेअरचे डबे आणि बाटल्या आता लवकरच कायमच्या बंद होतील, अशी चिन्हे आहेत.
टपरवेअरला घराघरात पोहोचवण्यात ब्राऊनी वाईज या अमेरिकेच्या सेल्सपर्सनचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी ‘टपरवेअर पार्टीज’ ही संकल्पना आणली आणि त्याअंतर्गत घरोघरी जाऊन स्त्रियांना थेट टपरवेअरचे वस्तू विकले जायचे. टपरवेअरच्या उत्पादनांना कसं विकायचं हे वाईज यांना चांगल्याप्रकारे माहीत होतं. त्यांची मार्केटिंगची पद्धतच वेगळी आणि कलात्मक होती. टपरवेअरचं प्लास्टिक तुटत नाही हे ग्राहकांना पटवून देण्यासाठी त्या प्लास्टिक भिंतीवर फेकून मारत असत. अशाप्रकारे ‘टपरवेअर पार्टीज’ ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय ठरली होती. या संकल्पनेनं अनेक महिलांना किचनच्या बाहेर आणलं आणि त्यांना टपरवेअरच्या मार्केटिंगमध्ये गुंतवलं. घराबाहेरच्या विश्वात महिलांना आपलं स्वतंत्र स्थान मिळालं होतं. काही टपरवेअरच्या विक्रेत्यांनी या पार्टीजचं रुपांतर मोठ्या उद्योगांमध्ये केलं. चांगली कामगिरी करणाऱ्या विक्रेत्यांना भरघोस बक्षीस दिलं जायचं. टपरवेअरने निर्माण केलेल्या या साखळीमुळे अनेक गृहिणींना रोजगार मिळाला. घरच्या घरी होणारा हा व्यवसाय पाश्चिमात्य देशातील अनेक स्त्रियांना घरखर्चाच्या तरतुदीला हातभार लावणारा होता.
टपरवेअरने त्याच्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना आपल्यासोबत बांधून ठेवलं होतं. 1950-1960 च्या दशकात हा ब्रँड लोकप्रिय झाला. घरोघरी टपरवेअरच्या डबे आणि बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. टपरवेअरच्या लवचिक हवाबंद सील डब्यांना इतरांच्या तुलनेत वेगळेपण आलं होतं.
‘टपरवेअर’ कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरी ॲन गोल्डमन म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून आव्हानात्मक मॅक्रो इकॉनॉमिक समस्यांमुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. विशेषत: कोविडच्या काळात या कंपनीची अवस्था आणखी बिकट झाली. त्यातून ही कंपनी अद्याप सावरू शकली नाही. कोविडनंतर कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीत मोठी घट झाली.”
कोरोना महामारीनंतर प्लास्टिक रेझिनसारख्या महत्त्वपूर्ण कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली. त्याचसोबत कामगारांचं वेतन, मालवाहतूक आणि इतर खर्चात प्रचंड वाढ झाल्याने तोटा वाढत गेला. शिवाय लॉकडाऊनमुळे लोक घरीच होते. अशावेळी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या यांसारख्या वस्तूंची विक्री कमी झाली. त्यामुळे कंपनीच्या नफ्याचं मार्जिन आणखी कमी झालं. याचा परिणाम कंपनीच्या बॅलेन्सशीटवर दिसू लागला आणि ‘टपरवेअर’ची आर्थिक स्थिती आणखी बिघडली. 2022 नंतर ऑगस्टमध्ये या कंपनीने चौथ्यांदा व्यवसायात तग धरून राहण्याबद्दल साशंकता व्यक्त केली. कंपनीची गंगाजळी कमी झाल्यामुळे भविष्यात व्यापारात टिकून राहणं अवघड असल्याची कबुली देण्यात आली. अखेर आता ‘टपरवेअर’ने चॅप्टर 11 अंतर्गत दिवाळखोरी जाहीर करून संरक्षण मागितलं आहे.
‘टपरवेअर’ कंपनीची सूचीबद्ध मालमत्ता 500 दशलक्ष ते 1 अब्ज इतकी आहे. तर त्यांची देणी 1 अब्ज ते 10 अब्जांपर्यंत वाढलंय. या कंपनीने अनेक दशकं किचनमधील गृहपयोगी वस्तू तयार करण्याच्या क्षेत्रावर राज्य केलं. मात्र 2020 नंतर कंपनीचा तोटा वाढत गेला. यावर्षी जून महिन्यात कंपनीने अमेरिकेतील उत्पादन करणारा कारखाना बंद केला. या कारखान्यातील जवळपास 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं.
रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपली उत्पादनं ठेवण्यासाठी कंपनीला अलिकडच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. आधीपासूनच टपरवेअरच्या उत्पादनांची विक्री ही स्वतंत्र प्रतिनिधींवर अवलंबून आहे. या जुन्या पद्धतीमुळे आधुनिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात ही कंपनी अयशस्वी ठरतेय. टपरवेअरचे मुख्य पुनर्रचना अधिकारी ब्रायन फॉक्स यांनी न्यायालयात दाखल केलेल्या निवेदनात म्हटलंय की, “टपरवेअर म्हणजे काय हे आता जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे. परंतु त्याची उत्पादनं कुठे मिळतील, हे फार क्वचित लोकांना माहीत आहे.” आर्थिक विश्लेषकांनीही टपरवेअरच्या थेट विक्री मॉडेलला चिकटून राहिल्याबद्दल आणि बदलत्या काळाबरोबर विकसित होण्यात अयशस्वी झाल्याबद्दक टीका केली.
जसजसा काळ बदलत गेला, तसतसं ग्राहकांमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंविषयी जागरूकता निर्माण झाली. त्यामुळे टपरवेअरची प्लास्टिकची उत्पादनं आजच्या काळातील पर्यावरणाबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांशी जुळवून घेऊ शकली नाहीत. “टपरवेअरचा काळ आता संपुष्टात आलाय. खरेदीदारांच्या वर्तनात बराच बदल झाला असून ग्राहकांनी बऱ्याच अंशी प्लास्टिकचा वापर सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक जागरूक मार्ग शोधले जात आहेत”, असं मत हरग्रीव्ह्स लॅन्सडाऊन इथल्या मनी अँड मार्केट्सच्या प्रमुख सुसाना स्ट्रीटर यांनी ‘बीबीसी’शी बोलताना नोंदवलंय. एकीकडे टपरवेअर या कंपनीने पर्यावरणाच्या दृष्टीने काही पावलं उचलून त्यांच्या उत्पादनात बदल केले नाहीत, त्यामुळे ग्राहकांच्या नवनव्या मागण्यांशी कंपनीला जुळवून घेता आलं नाही. तर दुसरीकडे स्वस्त, नॉन-ब्रँडेड प्लास्टिक कंटेनर्सकडूनही स्पर्धेचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टपरवेअर कंपनीला कामगारांचं उच्च वेतन आणि वाढलेला वाहतूक खर्च यांचा फटका बसला.
टपरवेअर कंपनीने 2023 च्या सुरुवातीला दिवाळखोरीचा इशारा देण्यास सुरुवात केली होती. कंपनीचं कर्ज 700 दशलक्ष डॉलरपेक्षाही जास्त झालं होतं. अचूक पुस्तकं आणि रेकॉर्ड राखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल या कंपनीला मोठ्या फेडरल दंडाचा सामना करावा लागला होता. या ब्रँडने नंतर दक्षिण कॅरोलिना इथला आपला एकमेव युएस कारखाना बंद केला. त्यातील 148 कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं.
गेल्या काही वर्षांत टपरवेअरने आपली पोहोच वाढवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही मार्ग अवलंबले. त्यांनी ॲमेझॉनवर तसंच टार्गेट आणि मॅसीच्या स्टोअरमध्ये आपली उत्पादनं विकण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये या ब्रँडने पर्यावरणपूरक सामग्रीसह बनवलेल्या काही वस्तूही लाँच केल्या होत्या. दोन वर्षांनंतर त्यांनी त्याचा विस्तार केला. मात्र तरीही आर्थिक अडचणी काही कमी झाल्या नाहीत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीतील अनेक पदाधिकाऱ्यांचे चेहरे बदलले. यात नव्या सीईओंचाही समावेश आहे. तरीही कंपनीची उलाढाल ही कर्जाच्या वजनाखालीच जात होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिवाळखोरीची बातमी समोर येताच टपरवेअरचे शेअर्स सोमवारी 49 टक्क्यांनी घसरले आहेत.
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि या नियमानुसार पावलं उचलली गेली नाहीत तर त्याचा फटका सहन करावाच लागतो. असंच काहीसं ‘टपरवेअर’ कंपनीच्या बाबतीत झालंय. इतक्या वर्षांत मार्केटमध्ये झालेले बदल, ग्राहकांचा बदललेला कल, वेळेनुसार बदललेली गरज याकडे गांभीर्याने पाहण्यात आणि त्यानुसार योग्य ती पावलं उचलण्यात 78 वर्षांची टपरवेअर ही कंपनी अयशस्वी ठरली. त्यामुळे टपरवेअरच्या डब्यांची झाकणं जरी हवाबंद असली तरी बदलाच्या अभावामुळे त्याला दिवाळखोरीची चीर पडली आहे.