नवी दिल्ली : स्वत:च्या कार भाडेतत्वावर देणाऱ्या झूमकार(Zoomcar)ने व्हेइकल होस्ट (Vehicle Host Program) नावाचा नावाची योजना सुरू केली आहे. या कार्यक्रमांतर्गत, कंपनीने खासगी वाहन मालकांना त्यांचे वाहन झूमकारवर समाविष्ट करण्याची ऑफर दिली आहे, ज्यासाठी प्रत्येक बुकिंगवर वाहन मालकांना नफ्यातला वाटा दिला जाईल. कंपनी गेल्या 6 महिन्यांपासून पायलट प्रोजेक्टवर काम करत आहे आणि झूमकारचा दावा आहे, की त्यांच्याकडे वेगवेगळ्या शहरांमधून 5, 000 कार लिस्ट झाल्या आहेत. या 8 शहरांमध्ये बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, गोवा, कर्नाटक आणि पुणे यांचा समावेश आहे. आता झूमकारने पुढील 12 महिन्यांत 100 शहरांमध्ये हा आकडा 50,000 कारच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
बेंगळुरूत मुख्यालय
वाहन मालकांना कमाई व्यतिरिक्त, झूमकार रेटिंगनुसार इन्सेंटिव्ह्स देणार आहे. याबाबत झूमकारचे सीईओ आणि सह-संस्थापक ग्रेग मोरन म्हणाले, की सुरुवातीच्या टप्प्यात कार मालकांनी दरमहा सरासरी 20,000 ते 30,000 रुपये कमावले. या कार्यक्रमांतर्गत, वाहन मालकांना महसूल दिला जातो, ज्यामध्ये एकूण रकमेच्या 60 टक्के रक्कम मालकाकडे जाते, तर उर्वरित 40 टक्के रक्कम झूमकारकडे असते. बेंगळुरूमध्ये झूमकारचे मुख्यालय असून कार एका तासासाठी किंवा एक दिवस किंवा कितीही दिवस भाडे देऊन कार घेता येते.
विस्तारावर भर
गेल्या ३ वर्षांत झूमकार फायद्यात आहे.मात्र, कंपनी नफ्यापेक्षा विस्तारावर भर देत आहे. झूमकारने अलीकडेच फिलीपाइन्स, इजिप्त, व्हिएतनाम आणि इंडोनेशियामध्ये आपल्या सुविधा सुरू केल्या आहेत, तर भारतातही कंपनी वेगाने वाढ करण्याचा विचार करत आहे. कंपनीने पुढील 1 वर्षात 10 नवीन देशांमध्ये आपला विस्तार करण्याची योजना आखली आहे. मोरन पुढे म्हणाले, की आम्ही परदेशातील विस्तार, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहोत. आम्ही पुढील 1 वर्षात सार्वजनिक कंपनी बनण्याची आकांक्षा बाळगतो, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सध्या आम्ही काम वाढवण्यासाठी, तसेच सहभागींचा नफा वाढवण्यासाठी गुंतवणूक करत आहोत.