RBI ने एका महिन्यात खरेदी केले 8 टन सोने, जाणून घ्या भारताकडे किती सोनं?
२०२४ मध्ये सोने खरेदीच्या बाबतीत भारत पोलंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार पोलंडच्या नॅशनल बँकेने २०२४ मध्ये सर्वाधिक ९० टन सोने खरेदी केले. असा WGCच्या अहवालात दावा करण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये जगभरातील मध्यवर्ती बँकांनी आपल्या सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ केली आहे. जगभरात वाढलेला भू-राजकीय तणाव, महागाईच्या परिणामामुळे सोन्याच्या खरेदीत तेजी दिसून येत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल अर्थात WGCच्या अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये मध्यवर्ती बँकांनी मिळून ५३ टन सोने खरेदी केले. विशेष म्हणजे यात भारताचेही मोठे योगदान आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल यांच्यानुसार आरबीआयने नोव्हेंबरमध्ये 8 टन सोने खरेदी केले, त्यानंतर आरबीआयचा एकूण सोन्याचा साठा 876 टन झाला आहे. अशा प्रकारे भारताने 2024 मध्ये एकूण 73 टन सोने खरेदी केले.
पोलंडनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर
डब्ल्यूजीसीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की २०२४ मध्ये सोने खरेदीच्या बाबतीत भारत पोलंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आकडेवारीनुसार पोलंडच्या नॅशनल बँकेने २०२४ मध्ये सर्वाधिक ९० टन सोने खरेदी केले. यानंतर पोलंडचा एकूण सोन्याचा साठा ४४८ टनांवर पोहोचला आहे. पोलंडच्या एकूण साठ्यात सोन्याचा वाटा १८ टक्के आहे. पोलंडव्यतिरिक्त उझबेकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने नोव्हेंबरमध्ये ९ टन सोने खरेदी केले आणि एकूण सोन्याचा साठा ३८२ टन इतकं झालेलं आहे.
चीनच्या People’s Bank ने 6 महिन्यांनंतर 5 टन सोने खरेदी केले आणि आता चीनचा एकूण सोन्याचा साठा 2,264 टनांवर पोहोचला आहे, जो चीनच्या एकूण साठ्याच्या 5 टक्के आहे. याशिवाय कझाकस्तान आणि जॉर्डनच्या मध्यवर्ती बँकांनीही त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे.
जाणून घ्या देशाकडे किती सोनं आहे
डब्ल्यूजीसीच्या अहवालानुसार, कझाकस्तानने 5 टन आणि जॉर्डनने 4 टन सोने खरेदी केले. विशेष म्हणजे काही देशांनी त्यांच्या सोन्याच्या साठ्यातही कपात केली आहे. डब्ल्यूजीसीच्या म्हणण्यानुसार, सिंगापूरच्या मॉनेटरी अथॉरिटीने नोव्हेंबरमध्ये 5 टन सोन्याची विक्री केली, ज्यामुळे त्याचा एकूण साठा 223 टन झाला.
सिंगापूरने २०२४ मध्ये एकूण ७ टन सोन्याची विक्री केली. त्याचवेळी फिनलँडने डिसेंबरमध्ये १० टक्के सोन्याचा साठा विकला आणि त्याचा एकूण साठा ४४ टनांवर पोहोचला. फिनलँडमधील सोन्याचा साठा आता १९८४ नंतरच्या खालच्या पातळीवर पोहचला आहे.
जगभरातील मध्यवर्ती बँकांनी केलेल्या या सोन्याच्या खरेदीत जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्याचे दिसून येते. भारतासारख्या देशांकडून सातत्याने होत असलेली सोन्याची खरेदी हे आर्थिक स्थैर्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल मानले जात आहे.