AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 रुपयांचे करणार तरी काय? कोण आहेत ही लोक ज्यांनी लपवल्यात या नोटा, RBI ची पण वाढली चिंता

RBI 2000 Rupees Note : गेल्या वर्षी 19 मे 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यावेळी बाजारात एकूण 3.56 लाख कोटी मूल्यांच्या 2 हजारांच्या नोटा होत्या. या नोटा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण अजूनही इतक्या नोटा परत आल्या नाहीत .

2000 रुपयांचे करणार तरी काय? कोण आहेत ही लोक ज्यांनी लपवल्यात या नोटा, RBI ची पण वाढली चिंता
या नोटा गेल्या तरी कुठं?
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 9:20 AM

देशात 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांचे प्रेम काही कमी झाले नाही. या नोटा बाजारातून बाद होऊन दीड वर्षे लोटले तरी काही जणांनी या नोटा दडवून ठेवल्या आहेत. बाजारातून मोठ्या प्रमाणात या नोटा बँकांमध्ये लोकांनी जमा केल्या. पण काही लोकांना या नोटांचा मोह काही सुटत नसल्याचे दिसून येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्याच्या ताज्या आकडेवारीत यावरून चिंता व्यक्त केली आहे. त्यानुसार, या नोटा चलनातून बाद करून सुद्धा अजून 6,970 कोटी रुपये मूल्याच्या नोटा बाजारातच आहेत. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंतची ही आकडेवारी आहे.

महिनाभरात 147 कोटी

RBI च्या ताज्या आकडेवारीनुसार, 2000 रुपयांच्या 98.04 टक्के नोटा परत आल्या आहेत. पण नंतर नोटा जमा करण्याची गती मंदावली. गेल्या महिनाभरात तर केवळ 147 कोटी नोटांची खेप आली. गुलाबी नोटा जमा होण्याची गती मंदावल्याने आरबीआय चिंतेत पडली आहे. 1 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय बँकेने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार 7,117 कोटी रुपये मूल्याच्या गुलाबी नोटा अजूनही बाजारात आहेत. आता हा आकडा 6,970 रुपयांवर आला आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत ही लोक, ज्यांनी नोटा दडवल्या?

1 जुलै 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, 7581 कोटी रुपये मुल्याच्या दोन हजारांच्या नोटा बाजारात होत्या. तर या 1 ऑक्टोबर रोजी हा आकडा 7,117 कोटी रुपये इतका होता. आता 31 ऑक्टोबर रोजी हा आकडा 6,970 कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजे जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत 611 कोटी रुपये मूल्याच्या नोटा जमा झाल्या आहेत. मे 2023 मध्ये ही नोट चलनातून बाद करण्यात आली होती तेव्हा बाजारात 3.56 लाख कोटी मूल्याच्या नोट बाजारात होत्या. 29 डिसेंबर 2023 रोजी हा आकडा 9,330 कोटी रुपये होता. तेव्हापासून या नोटा परत येण्याची गती मंदावली आहे.

19 शहरांमध्ये बदलता येतील 2000 च्या नोटा

आरबीआयच्या देशातील 19 शहरांमधील विभागीय कार्यालयात दोन हजारांची नोट बदलता येईल. तुम्ही थेट या कार्यालयात जाऊन नोटा बदलवून घेऊ शकता. नाही तर भारतीय टपाल खात्याकडून या नोटा आरबीआयच्या विभागीय कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकता.