बाराखडी अर्थसाक्षरतेची : चालू व बचत खात्यातील महत्त्वाचे ‘4’ फरक, जाणून घ्या…
व्यक्तिगत वापरासाठी बचत खाते (Savings Account) उघडले जाते. पैशांची बचत, छोटी किंवा मोठी खरेदी हा उद्देश यामागे असतो. चालू खाते (Current Account) आस्थापने किंवा व्यावसायिकांद्वारे उघडली जातात. गरजेनुसार नियमित आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना चालू खात्याची आवश्यकता भासते.
नवी दिल्ली : बँक ते बिटकॉइन्स सर्व व्यवहार आता हाताच्या बोटांवर आले आहेत. अर्थजगताचा ‘ग्लोबल टू लोकल’ विस्ताराचा वेग वाढला आहे. त्यामुळे आर्थिक साक्षरतेची बाराखडी आपल्याला गिरवायलाच हवी. आर्थिक साक्षरतेच्या प्रवासात जाणून घेऊ या चालू खाते आणि बचत खाते यामधील मुलभूत फरक. बचत खात्यात तुम्ही बचतीच्या उद्दिष्टाने पैशांची गुंतवणूक करतात आणि त्यावर कमाईरुपात व्याज मिळवतात. तर चालू खात्यात आर्थिक व्यवहारांसाठी पैशांची तरतूद करतात. नेमका दोन्ही खात्यातील फरक काय जाणून घेऊ या.
उद्देश खातेधारकाचा उद्देश बचत खात्यात पैसे गुंतवणूक करण्याद्वारे बचतीचे उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्य असते. जेणेकरून बचत खात्यातील ठेवींवर व्याज प्राप्त होईल. मात्र, चालू खात्यात खातेधारक दैनंदिन आर्थिक व्यवहारांसाठी रकमेची पूर्तता करण्याच्या उद्दिष्टाने पैशांची गुंतवणूक करतो.
कुणासाठी नेमके काय? व्यक्तिगत वापरासाठी बचत खाते उघडले जाते. सामान्यपणे कमी कालावधीसाठी बचत केली जाते. सुट्ट्यांसाठी पैशांची बचत, छोटी किंवा मोठी खरेदी हा उद्देश यामागे असतो. चालू खाते आस्थापने किंवा व्यावसायिकांद्वारे उघडली जातात. आपल्या गरजेनुसार नियमित आर्थिक व्यवहार करणाऱ्या खातेधारकांना चालू खात्याची अधिक आवश्यकता भासते.
किमान रक्कम चालू व बचत खात्यात किमान रकेमची तरतूद असते. तुमचे अकाउंट निष्क्रिय होण्यापासून टाळण्यासाठी खात्यात विशिष्ट रक्कम असणे बचत खात्यात असणे अनिवार्य असते. चालू खात्याच्या बाबतीत समान नियम लागू होतो. बचत खात्यात आवश्यक किमान रक्कम ही चालू खात्याच्या तुलनेने कमी असते.
व्याज बचत खात्यातील रकमेवर बँकांद्वारे व्याज प्रदान केले जाते. ठेवीची रक्कम आणि कालावधी यानुसार व्याज दरात भिन्नता आढळते. दीर्घकाळासाठी ठेवलेल्या रकेमवर तुलनेने अधिक व्याजदर प्राप्त होतो. बचत खात्यातून मुदतीपूर्वीच रक्कम काढण्यामुळे व्याजदरात कपात होते. तर चालू खात्यावरील रक्कम व्यावसायिक व्यवहारांच्या पूर्ततेसाठी वापरली जात असल्याने त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज प्रदान केले जात नाही.