रतन टाटा यांचे उत्तराधिकारी नोएल टाटा यांची एकूण संपत्ती किती?
टाटा ट्रस्टचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनानंतर आता त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना नवीन अध्यक्ष बनवण्यात आले आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये त्यांचा 66 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे टाटा ट्रस्टला मोठे महत्त्व आहे. नोएल टाटा यांच्याबद्दल जाणून घ्या.
रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. टाटा समुह हे देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे आहे. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची 66% भागीदारी आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना आता ही जबाबदारी देण्यात आली आहे. नोएल हे ६७ वर्षांचे आहेत. ते सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये विश्वस्त देखील आहेत. रतन टाटा यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी त्यांनाच बनवले जाईल अशी शक्यता होती. ज्याला आज ट्रस्टने मान्यता दिली आहे. प्रसिद्धीपासून ते दूर राहतात आणि शांतपणे आपले काम करतात. अशी नोएल टाटा यांची ओळख आहे.
नोएल टाटा यांचा जन्म 1957 मध्ये नवल टाटा आणि सिमोन टाटा यांच्या पोटी झाला. यूकेमधील ससेक्स विद्यापीठातून बॅचलरची पदवी मिळवली आहे. नंतर फ्रान्समधील जगातील शीर्ष व्यावसायिक शाळांपैकी एक असलेल्या INSEAD मधील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रमात भाग घेतला होता. टाटा ग्रुपमधील टाटा इंटरनॅशनलमध्ये त्यांनी व्यावसायिक प्रवास सुरू केला. ही कंपनी टाटांचा विदेशातील व्यवसाय पाहते. जून 1999 मध्ये त्यांना टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंटचे एमडी बनवण्यात आले. ही कंपनी त्यांची आई सिमोन टाटा यांनी स्थापन केली होती.
ट्रेंटला मोठ्या उंचीवर नेले
ट्रेंटला नोएल टाटा यांनी मोठ्या उंचीवर नेले. आज या कंपनीची मार्केट कॅप 2,93,275.38 कोटी रुपये आहे. टाटा समूहातील नोएल यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठा या यशामुळे वाढली. 2003 मध्ये ते टायटन इंडस्ट्रीज आणि व्होल्टासच्या बोर्डात आले. 2010 मध्ये त्यांची टाटा इंटरनॅशनलचे एमडी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर टाटा समूहाचे प्रमुख म्हणून रतन टाटा यांच्यानंतर त्यांनाच प्रमुख करण्याची शक्यता होती. 2011 मध्ये टाटा सन्सच्या बोर्डाने सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली होती.
सायरस मिस्त्री आणि नोएल यांचं नातं काय?
जेव्हा सायरस मिस्त्री यांनी टाटा समुहाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले तेव्हा या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण नोएल यांनी शांतपणे आपले काम चालू ठेवले. 2016 मध्ये सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून हटवण्यात आले आणि रतन टाटा यांनी पुन्हा कमान हातात घेतली. त्यानंतर एन चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे अध्यक्ष करण्यात आले. नोएल टाटा यांची 2018 मध्ये सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर रतन टाटा यांच्या निधनानंतर आता त्यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. सायरस मिस्त्री यांची बहीण आलू मिस्त्री हिचे लग्न नोएल टाटाशी यांच्याशी झाले आहे.
नोएल टाटा हे आता टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. याचे कारण म्हणजे 2022 मध्ये टाटा सन्स बोर्डाने त्यांच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये एकमताने सुधारणा केली होती. त्यानुसार एकच व्यक्ती ही दोन पदे भूषवू शकत नाही. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि टाटा सन्सचे अध्यक्षपद भूषवणारे रतन टाटा हे शेवटचे व्यक्ती होते, म्हणजेच नोएल टाटा हे टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. यासाठी त्यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.
नोएल टाटा यांची एकूण संपत्ती किती?
नोएल आणि आलू यांना तीन मुले आहेत – माया, नेव्हिल आणि लेआ. नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा 2016 मध्ये ट्रेंटमध्ये रुजू झाला आणि अलीकडेच स्टार बाजारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये नोएल टाटा यांच्या मुलींचाही सहभाग आहे. लेह टाटा, 39, यांना अलीकडेच इंडियन हॉटेल्सच्या गेटवे ब्रँडची जबाबदारी देण्यात आली होती. 36 वर्षीय माया टाटा यांना विश्लेषण आणि तंत्रज्ञानामध्ये रस आहे. ती टाटा डिजिटलमध्ये काम करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोएल टाटा यांची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 12,455 कोटी रुपये आहे.