ईशा अंबानीचे ‘राईट हँड’ कोण? त्यांनी मिळतो किती पगार?
रिलायन्स रिटेलटच्या वेबसाइटनुसार, या कंपनीने 2022-2023 या वर्षात 2.6 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. मार्च 2023 पर्यंत 7000 शहरांमध्ये 18040 स्टोअर्स चालवली गेली आहेत. यापैकी 3300 स्टोअर्स 2023 मध्ये उघडली गेली आहेत.
मुंबई : 5 फेब्रुवारी 2024 | भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती तब्बल 9.2 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा असून त्यांनी त्यांच्या मुलांवर या आणि त्याच्या सहकंपनीच्या अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. आकाश अंबानी हे रिलायन्स जिओचे प्रमुख आहेत, तर मुलगी ईशा अंबानी रिलायन्स रिटेलचा कारभार पाहते. अनंत अंबानीकडे रिलायन्स एनर्जीची जबाबदारी आहे. ईशा अंबानीच्या नेतृत्त्वाखाली रिलायन्स रिटेल ही रिलायन्सच्या सर्वांत यशस्वी उपकंपन्यांपैकी एक बनली आहे. दरवर्षी या कंपनीचा चांगला विकास होतोय. ज्याप्रमाणे मुकेश अंबानी यांना मनोज मोदी यांच्याकडून कामात मदत मिळते. त्याचप्रकारे ईशा अंबानीकडेही अशी एक महत्त्वाची व्यक्ती आहे, जी तिला तिची कंपनी चालवण्यास मदत करते. ही व्यक्ती ईशाचा ‘राईट हँड’ आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
रिलायन्स ब्रँडचे पहिले कर्मचारी
ईशा अंबानीचे ‘राईट हँड’ रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष आणि सीईओ दर्शन मेहता आहेत. ‘इकोनॉमिक्स टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, RRVL (रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड) या कंपनीचं प्री-इक्विटी मूल्यांकन ऑगस्ट 2023 पर्यंत 8.3 लाख कोटी रुपये इतकं आहे. दर्शन मेहता हे 2006 मध्ये स्थापन झालेल्या रिलायन्स ब्रँडचे पहिले कर्मचारी होते. ‘लिंक्ड इन’नुसार ते 2008 पासून रिटेल कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ म्हणून काम पाहत आहेत.
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड आणले भारतात
कंपनीच्या वेबसाइटनुसार, रिलायन्स रिटेलने अनेक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड्स भारतात आणले आहेत. यामध्ये बर्बेरी, व्हॅलेंटिनो, व्हर्साची, बोटेगा वेनेटा, बॅलेन्सियागा, मार्क्स अँड स्पेन्सर, टिफनी अँड कंपनी, जिमी चू, प्रेट अ मॅन्जर, पॉटरी बार्न यांसह इतर 85 ब्रँड्सचा समावेश आहे. ‘डीएन’नं दिलेल्या वृत्तानुसार, टॉमी हिलफिगर, नॉटिका अँड गँट, एर्मेनेगिल्डो झेग्ना, ब्रूक्स ब्रदर्स आणि डिझेस यांसारखे ब्रँड्स भारतात आणण्यामागे दर्शन मेहता यांचा हात आहे.
दर्शन मेहता यांचा पगार किती?
‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’नुसार दर्शन मेहता हे चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. त्यांनी जाहिरातीच्या क्षेत्रातून आपल्या करिअरची सुरुवात केली. याआधी त्यांनी त्रिकाया ग्रे ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम केलं होतं. रिलायन्स रिटेलचे फाइलिंग्स आणि ‘डीएनए’नुसार, दर्शन मेहता यांचा पगार 2020-2021 या वर्षी 4.89 कोटी रुपये इतका होता. 2018 मध्ये त्यांना पहिल्या ‘जीक्यू स्टाइल अवॉर्ड्स’मध्ये फॅशन बिझनेस अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. भारतातील फॅशन इंडस्ट्रीतील प्रभावासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.