Richest MP : येथे ओसंडून वाहते संपत्ती, कोण आहे हा धनकुबेर खासदार?
Richest MP : डॉ. बी पार्थ साराधी रेड्डी, यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. ते संसदेचे सर्वात श्रीमंत सदस्य आहेत. पण ही श्रीमंती राजकारणातून आली नाही तर, त्यांच्या कंपनीच्या भरभराटीमुळे आली आहे. हेटेरो ग्रुप ऑफ कंपनीज मधील गुंतवणूक आणि भागभांडवल त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : देशातील सर्वात श्रीमंत खासदार कोण असे विचारले तर तुम्ही काही खासदारांची नावे सांगाल. पण त्यातील एक ही खासदार डॉ. बी. पार्थ साराधी रेड्डी (Dr B Paratha Saradhi Reddy ) यांच्या इतका धनकुबेर नसेल. डॉ. रेड्डी हे राज्यसभेचे खासदार आहेत. सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या भारत राष्ट्र समितीचे ते नेते आहेत. ते संसदेचे सर्वात श्रीमंत सदस्य आहेत. विशेष म्हणजे ही श्रीमंती राजकारणातून आली नाही तर, त्यांच्या कंपनीच्या भरभराटीमुळे आली आहे. हेटेरो ग्रुप ऑफ कंपनीज (Hetero Group of Companies) ही त्यांच्या मालकीची फार्मा कंपनी आहे. ही कंपनी भारतीय फार्मा सेक्टरमधील मोठ्या कंपन्यांमधील एक आहे. त्यांच्या कंपनीसह कुटुंबियांकडे 39,200 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यावरुन त्यांची संपत्ती किती असेल याचा अंदाज बांधता येतो.
फार्मा कंपनीची केली सुरुवात
हेटेरो ग्रुप ऑफ कंपनीज ही फार्मा सेक्टरमधील प्रमुख कंपनी आहे. 1993 साली डॉ. रेड्डी यांनी ही कंपनी स्थापन केली. तेव्हापासून या कंपनीचा औषधी क्षेत्रात दबदबा आहे. गेल्या तीन दशकांपासून तर कंपनीने मोठी झेप घेतली आहे. डॉ. रेड्डी हे भारतातील चौथे सर्वात मोठे फार्मा टायकून म्हणून ओळखले जातात.
डॉ. रेड्डी यांची शिक्षणात पण भरारी
डॉ. रेड्डी हे पूर्वीपासूनच हुशार विद्यार्थी होते. त्यांनी सिथेंटिक ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली. ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी एमएस्सी केले. उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या अभ्यासाचा, ज्ञानाचा, संशोधनाचा मोठा फायदा या कंपनीला झाला. हेटेरो समूहाने अनेक क्षेत्रात मजल मारली. विविध औषधांवरील संशोधनात कंपनी अग्रेसर आहे. कंपनी अँटी-रेट्रोव्हायरल औषधांमध्येही आघाडीवर आहे.
इतकी आहे संपत्ती
डॉ. रेड्डी यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी नामांकन भरताना त्यांच्या संपत्तीचा तपशील दिला होता. ते 3900 कोटींच्या संपत्तीचे धनी असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती यामध्ये जोडली तर संपत्तीचा आकडा 5,300 कोटींवर पोहचतो. सध्या ते भारतातील सर्वात श्रीमंत खासदार आहेत. त्यासोबतच उच्च विद्याविभुषीत खासदारांपैकी एक आहेत.
फार्मा सेक्टरमधील टायकून
हरुन इंडियाच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत, 2022 मध्ये ते भारतीय फार्मा सेक्टरमधील चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. डॉ. पार्थ साराधी रेड्डी यांच्या फार्मा कंपनीचे मूल्य 39,200 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात त्यामध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली. ते भारत राष्ट्र समितीच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार आहेत.