Vaibhav Taneja : कोण आहेत वैभव तनेजा? टेस्ला कंपनीत असे पटकावले दुसरे स्थान, IIT मधून नाही तर येथून घेतले शिक्षण
Vaibhav Taneja : टेस्लाच्या आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांनी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती केली. त्यांचे शिक्षण या आयआयटीतून नाही तर या विद्यापीठात झाले आहे.
नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : भारतीय वंशाचे वैभव तनेजा (Vaibhav Taneja) यांच्यावर टेस्ला कंपनीने मोठी जबाबदारी टाकली आहे. टेस्लाच्या आर्थिक घाडमोडींवर त्यांचे बारीक लक्ष असेल. जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांनी तनेजा यांची मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पदावर नियु्क्ती केली. यापूर्वीचे सीएफओ जॅचरी किरखोर्न (Zachary Kirkhorn) यांनी पद सोडल्यानंतर ही घोषणा केली. सोमवारी या घडामोडीची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली.किरखोर्न यांना पदावरुन का बाजूला करण्यात आले, याची कंपनीने माहिती दिली नाही. टेस्ला भारतात प्रवेशासाठी उत्सूक आहे. टेस्लाच्या भारतीय सह कंपनीने पुण्यात एक कार्यालय पण भाड्याने घेतले आहे. त्याचवेळी ही अपडेट समोर आली आहे.
तनेजांचा टेस्ला प्रवास
एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली किरखोर्न यांनी 13 वर्षे या पदावर काम केले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीने मोठा विस्तार केला. वैभव तनेजा मार्च, 2019 पासून टेस्लाच्या सीएओ आणि मे 2018 मध्ये कॉर्पोरेट नियंत्रक पदावर कार्यरत आहे. त्यापूर्वी त्यांनी प्राईसवॉटर हाऊसकूपर्समध्ये पण काम केले आहे. वैभव तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे. आता ते टेस्ला कंपनीत क्रमांक दोनच्या पदावर पोहचले आहेत.
अशी आहे कारकीर्द
वैभव तनेजा यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण झाल्यावर 1996 मध्ये प्राईसवॉटर हाऊसकूपर्समध्ये करिअरला सुरुवात केली. कंपनीने कार्यालय अमेरिकेत शिफ्ट केले. तनेजा 2017 मध्ये टेस्ला कंपनीत रुजू झाले. त्यापूर्वी ते टेस्लाची सहायक कंपनी सोलर सिटीमध्ये काम करत होते. 2016 मध्ये टेस्लाने ही कंपनी ताब्यात घेतली होती. तनेजा या कंपनीचे कॉर्पोरेट कंट्रोलर झाले. त्यांनी दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणात महत्वाची भूमिका निभावली होती.
आर्थिक कामांचा मोठा अभ्यास
2021 मध्ये तनेजा, टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक झाले. तनेजा यांनी कंपनीचे पूर्व सीएफओ दीपक आहुजा आणि जॅचरी किरखोर्न यांच्यासोबत काम केले. या दरम्यान कंपनीचे तिमाही निकाल, अमेरिका आणि जगभरातील कंपनीच्या आर्थिक घडामोडी त्यांना जवळून पाहाता आल्या. त्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता.
किरखोर्न काय करतील?
किरखोर्न यांना पदावरुन का बाजूला करण्यात आले, याची कंपनीने माहिती दिली नाही. ते कंपनीत आता कोणत्या पदावर काम पाहातील, कोणते काम करतील, याबाबत कंपनीने काहीच स्पष्ट केलेले नाही. पण ते अजून कंपनीसोबत असतील, असे कंपनीने अमेरिकन बाजार नियामक SEC ला माहिती दिली.