भारतीयांनी आपली बचत का मोडली ? काय आहेत कारणे ? जाणून घ्या
बचत मोडावी लागल्याने भारतीयांच्या आर्थिक आरोग्यावर काय परिणाम झाला हे पर्सनल फायनान्स सर्व्हेच्या माध्यामातून समोर आले आहे.
भारतीयांना महगाईची झळ सोसावी लागत आहे. अन्नपदार्थ देखील महाग झाल्याने या खर्चाचा परिणाम खिशावर होत आहे. त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी कोरोनाचा शिरकाव झाल्याने बचतीवर परिणाम झाल्याचेदेखील दिसून आले. आपले आत्यावश्यक खर्च भागवण्यासाठी भारतीय आपली बचतदेखील मोडत आहेत. याचा नक्की भारतीयांच्या आर्थिक आरोग्यावर काय परिणाम झाला हे मनी 9 च्या पर्सनल फायनान्स सर्व्हेच्या माध्यामातून समोर आले आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे.
किती बचत मोडली ? :
सर्वेक्षणातील समोर आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 67 % कुटुंबांना गेल्या 5 वर्षात आपली बचत मोडावी लागली आहे. तर 33 % कुटुंब ही आपल्या चालू उत्पन्नातून आपला खर्च भागवत आहेत. गेल्या 5 वर्षात भारतीयांनी कोरोंनाचा सामना केला आहे. त्यानंतर वेतन कपात आणि नोकऱ्यांच्या कपातीमुळे उत्पन्न कमी झाले. पण उत्पन्न कमी होत असतानाच वैद्यकिय खर्चातमात्र मोठी वाढ झाल्याचे समोर आहे.
वैद्यकीय खर्च किती ? :
मनी 9 च्या सर्वेक्षणानुसार 67 % कुटुंबांनी आपली बचत मोडली. ही बचत मोडण्यामागे वैद्यकीय खर्च हे प्रमुख कारण आहे. यामध्ये सुमारे 22.3 % लोकांनी आपला उपचाराचा खर्च भागवण्यासाठी बचत मोडली तर 15.2 % लोकांना नोकरी गमावल्याने किंवा उत्पन्न थांबल्याने बचत मोडावी लागली. उपचारांच्या खर्चासोबतच शिक्षणाचा खर्च देखील अधिक आहे. यामध्ये 11 % कुटुंबांना केवळ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी बचत मोडावी लागली असल्याचे समोर आले आहे.
उपचार आणि शिक्षणासोबत लग्नदेखील बचत मोडण्यासाठी कारण आहे. सुमारे 8.2 % भारतीय कुटुंबांनी गेल्या 5 वर्षात केवळ लग्नाचा खर्च भागवण्यासाठी आपली बचत मोडली आहे. आणि तितक्याच कुटुंबांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी बचत मोडली आहे. कोरोनाकाळात अनेक कुटुंबांचा कमावत्या व्यक्तीला गमावले आहे. कमावती व्यक्तीच नसल्याने 2.3 % लोकांनी आपली बचत देखील गमावली आहे.
किती बचत शिल्लक ? :
तसेच या सर्वेक्षणामध्ये 24 % नोकरदार व्यक्तीना त्यांची नोकरी जाण्याची भीती आहे. तसेच यामध्ये ज्यांना नोकरी जाण्याची भीती आहे पण तितकी नाही अशी संख्या 56 % आहे. म्हणजेच देशभरात तब्बल 80 % लोक हे नोकरी जाण्याच्या भीतीने जगत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वेक्षणानुसार 24 % लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे त्यांच्याकडे 6 महीने घालवू शकतील इतकी बचत आहे. तसेच 56 % लोकांना नोकरी गेल्यास 2 ते 3 महिन्यासाठी आवश्यक इतकी बचत असल्याचे सांगितले आहे.