अखेर नीट युजी परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील इतके विद्यार्थी उत्तीर्ण
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमधून 1.17 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून 1.13 लाख आणि राजस्थानमधून 82,548 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची असलेल्या नीट युजी-2022 (NEET UG-2022) या परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा निकाल जाहीर (Result Announce) केला आहे. या निकालामध्ये राजस्थानच्या तनिष्काने अव्वल क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण (Pass) झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 9.93 लाखांहून अधिक आहे. यात महाराष्ट्रातील 1 लाख 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जुलैमध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालाकडे देशभरातील लाखो विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्राचा ‘या’ यादीमध्ये दुसरा क्रमांक
परीक्षेला एकूण 17.64 लाख विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये दिल्लीच्या वत्स आशिष बत्रा आणि कर्नाटकच्या हृषीकेश नागभूषण गांगुले यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमधून 1.17 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून 1.13 लाख आणि राजस्थानमधून 82,548 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
17 जुलै रोजी देशभरातील 497 शहरांमध्ये आणि भारताबाहेरील 14 शहरांमधील 3,570 विविध केंद्रांवर नीट युजीची परीक्षा झाली होती. या वैद्यकीय प्रवेश परीक्षेला चांगला प्रतिसाद लाभला होता. नोंदणी केलेल्यापैकी 95 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती
आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. प्रथमच ही परीक्षा दुबई आणि कुवेतसह अबुधाबी, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, क्वालालंपूर, लागोस, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर येथे घेण्यात आली होती.
परीक्षेतील टॉपर्स
– कर्नाटकातील रुचा पावशे हिला 715 गुण
– तेलंगणातील इराबेली सिद्धार्थ राव 711 गुणांसह उत्तीर्ण
– महाराष्ट्रातून ऋषी विनय बलसे 710 गुणांसह उत्तीर्ण
– पंजाबमधील अर्पिता नारंग 710 गुणांसह उत्तीर्ण
– कर्नाटकातील कृष्णा एस. आर. याला 710 गुणांसह उत्तीर्ण
– गुजरातमधील झील विपुल व्यास 710 गुणांसह उत्तीर्ण
– जम्मू-काश्मीरमधून हाजिक परवीझ लोन 710 गुणांसह उत्तीर्ण
नीट युजी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर घोषित करण्यात आला असून विद्यार्थी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.