Indian Army : काय आहे ‘टूर ऑफ ड्युटी’ ? जवानांची संख्या वाढावी म्हणून अनोखी संकल्पना,लष्करात सामील होण्याची संधी
लष्करातील जवानांची संख्या वाढावी आणि आपला खर्च कमी व्हावा यासाठी सरकार एका योजनेवर काम करतंय. ज्या योजनेअंतर्गत देशातील तरुण 3 ते 5 वर्ष लष्करात आपली सेवा देऊ शकतात.
नवी दिल्ली : सेनेत भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सरकार (Government) लवकरच एका योजनेची घोषणा (Announcement) करू शकतं. लष्करातील जवानांची संख्या वाढावी आणि आपला खर्च कमी व्हावा यासाठी सरकार एका योजनेवर काम करतंय. ज्या योजनेअंतर्गत देशातील तरुण 3 ते 5 वर्ष लष्करात आपली सेवा देऊ शकतात. ‘अग्निपथ एंट्री स्कीम’ असं या योजनेला नाव देण्यात येईल. या योजनेअंतर्गत देशातील तरुण 3 ते 5 वर्षांसाठी लष्करात सामील होऊन सेवा देतील. एका विशिष्ट कालावधीसाठी लष्करात सामील होण्याच्या संकल्पनेला ‘टूर ऑफ ड्युटी’ (Tour Of Duty) म्हणतात. टूर ऑफ ड्युटी ही संकल्पना नवीन नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा ब्रिटिश वायुसेनेच्या वैमानिकांवरील तणाव वाढला तेव्हा ब्रिटिश वायुसेनेने टूर ऑफ ड्युटीची संकल्पना अंमलात आणली होती. या अंतर्गत वायुसेनेते सामील होणाऱ्या वैमानिकांना 2 वर्षांसाठी 200 तास विमान चालविण्यासाठी सांगण्यात आले होते.
टूर ऑफ ड्युटीची संकल्पना कॉर्पोरेट जगात पण वापरली जाते. अमेरिकेच्या बऱ्याच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ही संकल्पना दिसून येते. टूर ऑफ ड्युटीच्या अंतर्गत लोकांना एका विशिष्ट कालावधीसाठी नोकरीवर ठेवलं जातं. या संकल्पनेअंतर्गत निवृत्त झालेल्या लोकांना देखील नोकरीवर ठेवलं जातं.
भारतात कसा असेल ‘टूर ऑफ ड्युटी’चा प्लॅन
टूर ऑफ ड्युटीचा प्लॅन कसा असेल याविषयी सरकारकडून अजून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही रिपोर्ट्स नुसार या योजनेअंतर्गत 3 ते 5 वर्षापर्यंत तरुणांना लष्करात भरती करून घेतलं जाईल. सुरुवातीला ही योजना सैन्यदलात लागू केली जाईल. नंतर नौदलात आणि वायुसेनेतेसुद्धा लागू केली जाऊ शकते. टूर ऑफ ड्युटी दरम्यान तरुणांना लष्करातील सैन्यांप्रमाणे ट्रेनिंग दिलं जाईल. त्यांना पोस्टिंग देखील दिलं जाईल. टूर ऑफ ड्युटी दरम्यान अधिकारी आणि सैनिक दोन्हींची भरती केली जाईल. निवृत्त अधिकाऱ्यांना या योजनेअंतर्गत अधिकारी पदांसाठी घेतलं जाईल. तरुणांना सैनिक म्हणून भरती करून घेतलं जाईल.
कसं असेल टूर ऑफ ड्युटी ?
याविषयी अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. असं म्हटलं जातंय की सुरुवातीला १०० तरुणांना या योजनेअंतर्गत भरती करून घेतलं जाऊ शकतं. यात 25% तरुण 3 वर्षांसाठी आणि 25% तरुण 5 वर्षांसाठी लष्करात सेवा देऊ शकतील. उरलेले 50 % तरुणांना कायमस्वरूपी सेवेत दाखल करून घेतलं जाऊ शकतं. या योजनेअंतर्गत तरुणांना 80 ते 90 हजार रुपये पगार मिळू शकतो. रिपोर्ट्स नुसार, 3 ते 5 वर्ष लष्करात सामील होणाऱ्या तरुणांना नॅशनल पेन्शन स्कीममध्ये सुद्धा सामील करून घेतलं जाऊ शकतं. अशा तरुणांना एका विशिष्ट कालावधीसाठी मेडिकल बेनिफिट सारखी सुविधा पण देण्यात येणार आहे.
तरुणांना दिलं जाणार ट्रेनिंग
टूर ऑफ ड्युटी ची संकल्पना आर्मी चीफ जनरल एमएम नरवणे यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये भारतात आणली. त्यांनी संरक्षण मंत्रालयासमोर यासंदर्भातली माहितीसुद्धा दिली होती. या योजनेअंतर्गत तरुणांना ट्रेनिंग दिलं जाईल ज्याच्या मदतीने पुढे जाऊन ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये देखील काम करू शकतील.
या संकल्पनेचा फायदा काय ?
कोरोना महामारीमुळे लष्करात दोन वर्ष भरती होऊ शकली नाही. संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या अहवालानुसार लष्करात अधिकारी आणि सैनिकांची कमतरता आहे. या योजनेमुळे लष्कराला हजारो कोटी रुपये वाचवता येतील.
इतर बातम्या :