Aviation Jobs: विमान वाहतूक क्षेत्रात येत्या 2 वर्षात प्रचंड रोजगार! नव्या भरतीची माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर
यात वैमानिक, केबिन क्रू, अभियंते, तंत्रज्ञ, विमानतळ कर्मचारी, ग्राउंड हँडलिंग, कार्गो, रिटेल, सुरक्षा, प्रशासकीय आणि विक्री कर्मचारी म्हणून भरती केली जाऊ शकते. नव्या भरतीची माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर - civilaviation.gov.in मिळेल.
नागरी उड्डाण मंत्रालयाने काल म्हणजे 08 ऑगस्ट 2022 रोजी संसदीय समितीसमोर हा अहवाल सादर केला. या दरम्यान नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, येत्या दोन वर्षात देशातील विमान वाहतूक क्षेत्रात 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो. यात वैमानिक (Pilot), केबिन क्रू, अभियंते (Engineers), तंत्रज्ञ, विमानतळ कर्मचारी, ग्राउंड हँडलिंग, कार्गो, रिटेल, सुरक्षा, प्रशासकीय आणि विक्री कर्मचारी म्हणून भरती केली जाऊ शकते. नव्या भरतीची माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर – civilaviation.gov.in मिळेल. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हवाई (Aviation) वाहतूक आणि वैमानिक बांधकाम क्षेत्रात सध्या 2,50,000 लोक कार्यरत आहेत. सन 2024 पर्यंत हा आकडा 3,50,000 पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज मंत्रालयाने व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत 1 लाख लोकांना थेट नोकरी मिळू शकते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे.
या पदांना मिळणार नोकऱ्या
मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कामांपैकी सुमारे 50 टक्के कामे ब्लू-कॉलर कामगारांसाठी असतील – लोडर, क्लीनर, ड्रायव्हर्स, मदतनीस इत्यादी. तसेच मंत्रालयानुसार येत्या पाच वर्षांत विमान प्रवाशांची वाढती संख्या बघता आणखी १० हजार वैमानिकांची गरज भासणार आहे.
केंद्रीय मंत्री सिंधिया यांची माहिती
रविवारी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, प्रवासी, विमान आणि विमानतळांच्या बाबतीत वेगाने विकास होत आहे. अभूतपूर्व आणि निकोप वाढीसाठी देशाचे हवाई वाहतूक क्षेत्र सज्ज आहे. वर्ष २०२७ पर्यंत देशातील विमान प्रवाशांची संख्या वाढून ४० कोटी होण्याची शक्यता आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 2,368२, 2020 मध्ये 400 आणि 2021 मध्ये 296 वैमानिकांची भरती करण्यात आली होती. 2021 मध्ये नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) आपल्या इतिहासात सर्वाधिक 862 व्यावसायिक पायलट परवाने जारी केले. काही विशिष्ट प्रकारच्या विमानांवर कमांडर्सची प्रचंड कमतरता आहे. सध्या भारतीय वाहकांवर 87 परदेशी वैमानिक काम करत आहेत.
विमान वाहतूक क्षेत्रात नोकरीची मागणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही वर्षात नागरी विमान वाहतूक क्षेत्राची वाढ खूप वेगाने झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. विमान वाहतूक उद्योगात वैमानिक, विमान देखभाल अभियंते, केबिन क्रू, एअर होस्टेस, विमानाचे कारभारी, केबिन क्रू आणि ग्राऊंड ड्युटी स्टाफ अशा अनेक क्षेत्रांत नोकरीची मागणी आहे.