CRPF Recruitment : देशातील सर्वात मोठी भरती, सीआरपीएफमध्ये एका झटक्यात लाखाहून अधिक पदे भरणार; नोटिफिकेशन जारी
केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता केंद्राच्या विविध खात्यात मेगाभरती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीआरपीएफमध्ये सव्वालाखाहून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. त्याचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : सीआरएफ म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील सर्वात मोठी भरती होणार आहे. सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबलची दीड लाख पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. सीआरएफकडून 1,29,929 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यात 1,25,262 पुरुष उमेदवारांची भरती केली जाईल. तसेच 4667 महिला उमदेवारींची भरती केली जाणार आहेत. या 4667 जागा महिलांसाठीच राखीव आहेत. त्यामुळे सीआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी सीआरपीएफच्या crpf.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अप्लाय करावा.
कॉन्स्टेबल पदासाठी दर महिन्याला 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळणार आहे. ही भरती कॉन्स्टेबल पदाच्या (जनरल ड्युटी)साठी होत आहे. केवळ भारतीय नागरिकांनाच उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे. नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना नोकरीत प्राधान्य दिलं जाणार नाही. ज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 आहे, त्यांना कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करता येणार आहे. एससी आणि एसटी कॅटेगिरीतील तरुणांच्या वयाच्या मर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.
निकष काय?
कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही बोर्डाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा त्या समकक्ष शैक्षणिक पात्रता असायला हवी. तरुणांना फिजिकल आणि मेडिकल टेस्ट द्यावी लागणार आहे. कॉन्स्टेबल पदासाठी फिजिकल एफिसेन्सी टेस्ट आणि लेखी परीक्षाही द्यावी लागणार आहे.
Ministry of Home Affairs has issued a notification regarding recruitment for around 1.30 lakh posts of constables in CRPF pic.twitter.com/XgyaOzj9GL
— ANI (@ANI) April 6, 2023
अग्नीवीरांनाही संधी
माजी अग्नीवीर जर नोकरीसाठी अर्ज करत असेल तर त्यालाही शारीरिक पात्रता चाचणीला सामोरे जावं लागणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच केंद्रातील रिक्त पदे भरणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच या पदांच्या नियुक्तीच्या नोटिफिकेशन काढणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यानुसारच सीआरपीएफच्या भरतीची नोटिफिकेशन काढण्यात आली आहे.