मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑगस्ट 2021 मध्ये 17 हजार 372 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.
अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 20202 मध्ये राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्टअखेर 1 लाख 11 हजार 083 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
मंत्री नवाब मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 91 हजार 091 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपल2ब्ध झाले आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
मंत्री नवाब मलिक म्हणाले की, माहे ऑगस्ट 2021 मध्ये विभागाकडे 39 हजार 574 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 9 हजार 216, नाशिक विभागात 6 हजार 180, पुणे विभागात 10 हजार 980, औरंगाबाद विभागात 8 हजार 109, अमरावती विभागात 2 हजार 740 तर नागपूर विभागात 2हजार 349 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
माहे ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 17 हजार 272 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 6 हजार 190, नाशिक विभागात 2 हजार 168, पुणे विभागात 4 हजार 629, औरंगाबाद विभागात 3 हजार 738, अमरावती विभागात 449 तर नागपूर विभागात 198 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.
इतर बातम्या:
SSC CGL 2019 Skill Test : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून CGL परीक्षेच्या कौशल्य चाचणीची तारीख जाहीर
Nawab Malik Said 17372 candidates received job during August Month