Google: गुगलच्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याची धमकी, कंपनीने थेटच सांगितले, परफॉर्मन्स दाखवा नाहीतर घरी जा..
गुगलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना हे स्पष्टपणे सांगितलेले आहे की, येत्या काळात चांगले काम करुन दाखवा, अन्यथा कंपनी घेईल त्या कठोर निर्णयाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मॅनेजमेंटनेही कर्मचाऱ्यांना कपातीसाठी तयार रहा, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे.
नवी दिल्ली – पुढच्या तीन महिन्यांत कपंनीचे निकाल चांगले आले नाहीत, तर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी लागेल, अशी धमकी गुगल (Google company)या नामांकित कंपनीने दिली आहे. गुगल कंपनीच्या सेल्स टीमने गुगल कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण विक्रीची उत्पादकता आणि कर्मचाऱ्यांची (employee cut) उत्पादकता पाहून थेट नोकरी जाण्याचा इशारा दिला आहे. गुगुल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (CEO Sundar Pichai)यांनी नुकतेच असे वक्तव्य केले होते की कंपनीकडे खूप कर्मचारी आहेत, मात्र त्या तुलनेत काम बरेच कमी आहे. पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करण्याचा सल्ला दिला होता. आपले उत्पादन अधिक चांगले करण्यासाठी आणि ग्राहकांना मदत करण्यावर लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी गुगलच्या कर्मचाऱ्यांना केले होते. आता बिझनेस इनसायरच्या अहवालानुसार, गुगल कंपनीतील कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा इशारा देण्यात आला आहे.
परफॉर्मन्स दाखवा नाहीतर घरी जा
गुगलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना हे स्पष्टपणे सांगितलेले आहे की, येत्या काळात चांगले काम करुन दाखवा, अन्यथा कंपनी घेईल त्या कठोर निर्णयाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. मॅनेजमेंटनेही कर्मचाऱ्यांना कपातीसाठी तयार रहा, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. पुढच्या तिमाहीत कंपनीला किती उत्पन्न होणार, त्यावर कपात होणार की नाही ते ठरणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलेले आहे.
गुगलचा रेव्हेन्यू दोन वर्षांत सर्वाधिक कमी
गुगल कंपनीतील नवी भरती थांबवण्यात आली असल्याने गुगलमध्ये काम करणारे कर्मचारी सध्या धास्तीत आहेत. कधीही नोकरीवरुन काढून टाकतील, ही भाती त्यांना सतावते आहे. गेल्या तिमाहीतील गुगल कंपनीचा एकूण रेव्हेन्यू हा गेल्या दोन वर्षांतील सर्वात कमी रेव्हेन्यू होता. टेक कंपन्या गेल्या काही काळांपासून अडचणींचा सामना करीत आहेत. त्यामुळेच नॅस्डेक कंपोझिट इंडेक्स यावर्षा आत्तापर्यंत २६ टक्क्यांनी घसरलेला आहे.
दोन आठवडे हायरिंगही रोखले
गेल्या महिन्यात गुगलच्या सीईओंनी कर्मचाऱ्यांनी अधिक काम करावे, असे सांगितले तसेच चांगले निकाल येण्यासाठी काही क्लपना असतील तर त्याही सूचना मागवल्या आहेत. कंपनीतील कर्मचाऱ्यांची प्रोडक्टिविटी अपेक्षित नसल्याची चिंता पिचाई यांनी व्यक्त केली आहे. जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी, दोन आठवड्यांसाठी हायरिंग रोखण्यात आले आहे. त्यानंतर ही मुदत अधिक वाढवण्यात आली आहे. आर्थिक मंदीमुळे हायरिंग रोखण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. तोपर्यंत अधिकृतरित्या कपातीबाबत कंपनीकडून काही सांगण्यात आले नव्हते. मात्र कर्मचाऱ्यांची चिंता वाढली होती.
या विभागांमध्ये मात्र होणार भरती
सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे की, २०२२ आणि २०२३ मध्ये कंपनीचा फोकस इंजिनिअरिंग, तांत्रिक विशेषज्ञ यासारख्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांवर असणार आहे. २०२२ सालातील कर्मचाऱ्यांच्या भरतीचा कोटा पूर्ण करण्यात आला आहे. यपुढे अधिक उद्यमशील होण्याची आणि अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले आहे.