नवी दिल्ली: UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा असल्याचे म्हटले जाते. त्यात यश मिळवण्यासाठी अनेक उमेदवारांना अनेक वर्षे लागतात. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सनदी अधिकाऱ्याच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. यामुळेच यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतरही उमेदवारांना काटेकोर प्रशिक्षण घ्यावे लागते. मसूरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) इथे आयएएस प्रशिक्षण घेतले जाते. आता एवढा अभ्यास करून सिलेक्शन झाल्यावर देखील या अधिकाऱ्यांचं काय प्रकारचं प्रशिक्षण असतं? त्यात काय शिकवलं जातं? प्रशिक्षणात काय असतं? जाणून घेऊया…
LBSNAA मध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्या उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्तीपासून मानसिक आरोग्यापर्यंत मजबूत केले जाते. प्रशिक्षणादरम्यान इथे हिमालयन ट्रेकिंगही केले जाते. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला त्यात सामील व्हावे लागते. याशिवाय ग्रामविकास, कृषी व उद्योग विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. अधिकारी पद मिळण्यापूर्वी या प्रशिक्षणात सर्वांना सर्व क्षेत्रात सक्षम केले जाते.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत जावे लागते. उमेदवारांना मूलभूत प्रशासकीय कौशल्ये शिकविली जातात. इथे येणारे सर्व उमेदवार आपल्या प्रोफाईलवर इथल्या आठवणी नक्कीच शेअर करतात. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला इथे सारखेच प्रशिक्षण मिळते.
UPSC नागरी सेवा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत फेरीतून मिळालेल्या गुणांच्या आधारे रँक मिळतो. या पदांनुसार त्यांची आयएएस, आयपीएस किंवा आयएफएससाठी निवड केली जाते. रँकनुसार उमेदवारांना कॅडर अलॉट केले जाते.
मसूरी येथील LBSNAA येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कॅडरच्या राज्यात पाठवले जाते. अशा परिस्थितीत राज्यात योग्य प्रकारे काम करण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थींना स्थानिक भाषा शिकावी लागते. भाषा शिकल्यानंतर उमेदवारांना पुन्हा मसुरीला यावे लागते आणि मग भाषा शिकल्यानंतरच ते रुजू होतात.