Delhi Crime : दिल्लीत बारावीच्या विद्यार्थ्याचा तिघांवर चाकूहल्ला; शाळेच्या आवारात घडलेल्या घटनेने खळबळ
सुरुवातीला हे भांडण केवळ हाणामारीपुरते मर्यादित होते, मात्र नंतर रागाच्या भरात मोहितने साथीदारावर चाकूने वार केले. त्याच्या छातीवर चाकूने वार केले. यानंतर इतर विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील गुन्हेगारीचे प्रमाण कमी न होता दिवसागणिक वाढतच चालले आहे. विशेष म्हणजे, शाळा-कॉलेजमध्येही गुन्हेगारी, मारामारी, हत्या, लैंगिक शोषण असे प्रकार घडू लागले आहेत. त्यात शाळकरी मुलांचा सहभाग आढळून येत असल्यामुळे पालक मंडळी आणि पोलीस यंत्रणा चिंतेत सापडली आहेत. नुकतीच दिल्लीतील एका सरकारी शाळेत चाकू हल्ल्याची घटना घडली. किरकोळ वादातून बारावीच्या विद्यार्थ्याने सुरुवातीला एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला (Knife Attack) केला. या हल्ल्यामुळे इतर विद्यार्थी हादरून गेले. त्यांनी तातडीने वाद (Dispute) सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे गेलेल्या आणखी दोन विद्यार्थ्यांवरही आरोपी मुलाने चाकूहल्ला केला. या घटनेत तीन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक (Arrest) केली असून पुढील तपास केला जात आहे.
किरकोळ वादाचे चाकू हल्ल्यात पर्यावसन
13 जुलै रोजी मोदन गढी भागातील एका सरकारी शाळेत चाकू हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. मधल्या सुट्टीच्या वेळेत मोहित नावाच्या विद्यार्थ्याचे त्याच्या इतर वर्गामित्रांशी किरकोळ वादातून भांडण झाले. सुरुवातीला हे भांडण केवळ हाणामारीपुरते मर्यादित होते, मात्र नंतर रागाच्या भरात मोहितने साथीदारावर चाकूने वार केले. त्याच्या छातीवर चाकूने वार केले. यानंतर इतर विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोहितला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी मोहित स्वतःचा राग नियंत्रणात आणू शकला नाही. तो इतका संतापला की त्याने इतर दोन विद्यार्थ्यांवरही चाकूने हल्ला केला. सध्या तिन्ही जखमी विद्यार्थ्यांवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे जबाबही नोंदवले आहेत. संपूर्ण घटना समजल्यानंतर आरोपी मोहितला अटक करण्यात आली आहे.
हल्ल्यामागील नेमक्या कारणाचा अद्याप उलगडा झालेला नाही
मोहितने त्याच्या वर्गमित्रांवर हल्ला करण्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. त्याने हा चाकू कोठून आणला? त्याला वर्गामध्ये चाकू घेऊन जाण्यास परवानगी कोणी दिली? तो कुठल्या कारणावरून इतका संतापला? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी अद्याप दिलेली नाहीत. पोलीस सध्या मोहितच्या चौकशी करीत असून त्याच्या अधिक चौकशीतून नेमक्या कारणाचा खुलासा होऊ शकतो, असे दिल्ली पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने हल्ला कुणाच्या जीवावर बेतलेला नाही, असे पोलिसांनी नमूद केले. दरम्यान, वर्गातील वादावर आतापर्यंत मोहितच्या कुटुंबीयांनी किंवा खुद्द मोहितने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे भांडण कोणत्या कारणास्तव सुरू झाले याबाबत शाळेकडूनही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. (12th students attacked three with knives in Delhi)