पाटणा : बिहारच्या नवादा जिल्ह्यात दोन दिवसात तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व मृतकांनी विषारी दारु प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी तशाप्रकारचा जबाब लिहिण्यास नकार दिल्याची माहिती मृतकांच्या कुटुंबियांनी दिली आहे. मृतकांचा नातेवाईकांनी मृतकांचा कोणत्यातरी आजारामुळे मृत्यू झाला, असा जबाब द्यावा यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी दबाब टाकला, असा आरोप करण्यात आला आहे. पण मृतकांच्या नातेवाईकांच्या आरोपांचं जिल्हा प्रशासनाकडून खंडन करण्यात आलं आहे (14 people die due to poisonous liquor in Navada Bihar ).
जिल्हा प्रशासनाकडून आरोपांचं खंडन
आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वांचा मृत्यू वेगवेगळ्या आजारामुळे झाला आहे. यापैकी तिघांचा रिपोर्ट येणं अजून बाकी आहे, असं स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलं आहे. पण सिसवा गावाच्या गोपाल कुमार या मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत (14 people die due to poisonous liquor in Navada Bihar ).
गोपाल कुमारने होळीच्या दिवशी दारु प्राषाण केली
गोपाल कुमार होळीच्या दिवशी सुट्टी घेऊन घरी आला होता. त्याने घरात दारु पिली होती. दारु पिल्यानंतर काही तासांनी मध्यरात्री त्याची अचानक प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती त्याच्या कुटुबियांनी दिली.
गोपाल कुमारच्या कुटुंबियांचे पोलिसांवर गंभीर आरोप
पोलीस मृतक गोपाल कुमारच्या घरी रात्री उशिरा गेले. तिथे त्यांनी गोपाल कुमारची पत्नी गुडीया कुमारीला लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी जबरदस्ती केली. यावेळी त्यांनी धमकावण्याचा देखील प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधित पत्रावर गोपाल कुमारचा दारु पिऊन नाही तर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असं लिहिलं होतं. त्या पत्रावर गोपाल कुमारच्या पत्नीने स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी गोपाल कुमारच्या मोठ्या भावाला धमकावून स्वाक्षरी घेतली, असा आरोप गोपाल कुमारच्या कुटुंबियांनी केला आहे.
राजद आमदार विभा देवी यांचाही पोलिसांवर आरोप
याप्रकरणी राजद आमदार विभा देवी यांनी देखील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “पोलीस स्वत:च्या चुका लपवण्यासाठी अशाप्रकारे वागत आहेत. दारु सगळीकडे सुरु आहे आणि दारुमुळेच गोपालचा मृत्यू झाला, ज्याबाबत त्याचे कुटुंबिय सांगत आहे. पोलीस त्यांच्यावर जबरदस्ती करत आहेत”, असा आरोप विभा देवी यांनी केलाय.
पोलिसांची प्रतिक्रिया काय?
या प्रकरणावर एसपी डीएस साबलाराम यांनी प्रतिक्रिया दिलीय. गोपाल कुमारचा मृत्यू हृदय विकाराच्या झट्याने झाला. त्याचा आमच्याकडे पुरावा देखील आहे. पोलीस त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. त्यांचे पोलिसांवर जे आरोप असतील ते त्यांनी एफआयआरवर लिहून द्यावे. त्या तक्रारीनुसार चौकशी केली जाईल. मात्र, गोपालच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका हेच आहे, असं साबलाराम यांनी सांगितलं.
हेही वाचा : ना वाझेंशी भेट, ना अँटिलिया स्फोटक कटात सहभाग, यूपीच्या बड्या गँगस्टरने आरोप फेटाळले