राजस्थान : राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात श्रद्धेच्या नावावर अंधश्रद्धेचे भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. एका किशोर वयीन मुलीने आपल्या 7 वर्षाच्या चुलत बहिणीची हत्या (Murder) केल्याची घटना डुंगरपूर जिल्ह्यातील चितरी पोलीस स्टेशन अंतर्गत झिंझवा फाला गावात घडली आहे. यावेळी अंगात देवी आल्याचे सांगत मुलीने एकच गोंधळ घातला. या हल्ल्यात मुलीचे वडील आणि काकाही जखमी (Injured) झाले आहेत. श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धे (Superstition)पोटी या मुलीने देवी अंगात आल्याचे सांगत चांगलाच गोंधळ घातला. यादरम्यान मुलीने तिच्या 7 वर्षीय चुलत बहिणीच्या मानेवर तलवारीने वार करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे.
चितरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या झिंझवा फाला गावात रविवारी रात्री दशा माता व्रत उत्सवादरम्यान एका 15 वर्षीय मुलीने आपल्या अंगात देवी आल्याचे सांगत तलवारीने गोंधळ घातला. तसेच तेथेच झोपलेल्या आपल्या 7 वर्षीय चुलत बहिणीवर तलवारीने वार करून तिची मान धडापासून वेगळी केली. हरियाली अमावस्येच्या दिवसापासून चितारी झिंझवा फाला येथील शंकरचा मुलगा रामजी डेंडोर यांच्या घरी दशामातेची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. त्याअंतर्गत रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दशामातेच्या पूजेचा कार्यक्रम रात्री आठ वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यादरम्यान, शंकरच्या 15 वर्षीय मुलीने हातात नंग्या तलवार घेऊन लोकांना सांगितले की ती सर्वांना ठार करेल. असे म्हणत ती तलवार घेऊन घराच्या अंगणात धावू लागली, असे पोलीस अधिकारी गोविंद सिंह यांनी सांगितले.
शंकर आणि त्याचा मोठा भाऊ सुरेश यांनी मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान मुलीने वडील आणि काकांवर तलवारीने वार केले. त्यामुळे दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. यादरम्यान सुरेशची 7 वर्षांची मुलगी पुष्पा ही त्याच घरात घरात झोपली होती. मुलगी तिच्याजवळ गेली आणि तिला ओढत घरातील दुसऱ्या खोलीत नेले आणि तलवारीने तिचा गळा कापला. घरच्यांनी कसेतरी घेराव घालून मुलीला पकडले. घटनेची माहिती मिळताच चितरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलीला ताब्यात घेतले आहे. बांसवाडा येथून एसएफएल टीमला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (A 15-year-old girl killed her 7-year-old sister with a sword out of superstition)