सायरस मिस्त्री अपघात प्रकरण, दोन महिन्यानंतर महिला कार चालकावर गुन्हा दाखल
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर तब्बल दोन महिन्यांनी याच गाडीत प्रत्यक्षदर्शी असलेल्या चालक अनाहीता पंडोल यांचे पती डेरिअस पंडोल यांचा पालघर पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.
पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणी दोन महिन्यानंतर महिला कार चालक अनहिता पंडोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनहिता पंडोल कासा पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात कलम 304 (अ), 279, 337, 338, MVA 112/183, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनहिता पंडोल यांचे पती डेरिअस पंडोल यांच्या जबाबानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर तब्बल दोन महिन्यांनी याच गाडीत प्रत्यक्षदर्शी असलेल्या चालक अनाहीता पंडोल यांचे पती डेरिअस पंडोल यांचा पालघर पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.
डेरिअस पंडोल यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने त्यांचा जबाब नोंदवला
डेरिअस पंडोल हे याच अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारताच मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन पालघर पोलिसांनी या अपघात प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवला आहे.
अनहिता पंडोल यांची प्रकृती सुधारताच जबाब नोंदवणार
दुर्घटनास्थळी अचानक तीन लेनच्या दोन लेन झाल्याने हा अपघात घडल्याचं डेरिअस पंडोल यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. अपघात घडला त्यावेळी पती डेरिअस पंडोल चालक अनहिता पंडोल यांच्या शेजारील पुढील सीटवरील बसले होते. चालक अनहिता पंडोल अजूनही उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारताच त्यांचाही जबाब नोंदवण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
पालघरमध्ये सूर्या नदीच्या पुलावर झाला होता अपघात
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 4 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री आणि त्यांचे सहकारी जहांगीर पंडोल यांचा जागीच मृत्यू झाला होता.
तर कार चालक अनहिता पंडोल आणि त्यांचे पती डेरिअस पंडोल गंभीर जखमी झाले होते. सुर्या नदीच्या पहिल्या डिव्हायडरला गाडी आदळून हा अपघात झाला. अनहिता पंडोल, डेरिअस पंडोल, जहांगीर पंडोल हे सायरस मिस्त्री यांचे कौटुंबिक मित्र होते.