डोंबिवलीतील ठेकेदारावर गुन्हा दाखल; ‘या’ घटनेप्रकरणी कारवाई
डोंबिवली-कोपर रोड परिसरातील रेल्वेची संरक्षक भिंत बांधणीचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच जुनी भिंत मजुरांच्या अंगावर पडली होती.
डोंबिवली / सुनील जाधव (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे मार्गावरील डोंबिवलीतील रेल्वेच्या जीवघेण्या संरक्षक भिंतीप्रकरणी पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे. संरक्षक भिंत कोसळून (Wall Collapse) झालेल्या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू (Death) तर तीन जण जखमी (Injury) झाले होते. त्या प्रकरणी पोलिसांनी मुंबईतील शिवा एंटरप्रायझेस तसेच या ठेकेदार कंपनीशी संबंधित जबाबदार व्यक्तींविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निष्काळजी आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
डोंबिवली-कोपर रोड परिसरातील रेल्वेची संरक्षक भिंत बांधणीचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच जुनी भिंत मजुरांच्या अंगावर पडली होती. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाले होते.
बुधवारी ही घटना घडली होती. याप्रकरणी डोंबिवलीतील पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे.
विष्णुनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
विष्णूनगर पोलीस ठाण्यात शिवा एंटरप्रायझेस मुंबई व त्यांच्याशी जबाबदार लोकांविरोधात निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी ही माहिती दिली आहे.
भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते सातजण
मध्य रेल्वे प्रशासनाने कोपर रेल्वे स्थानक ते डोंबिवली रेल्वे स्थानक यादरम्यान संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू केले आहे. या नवीन भिंतीच्या बाजूला बारा फूट उंचीची एक जुनी संरक्षक भिंत आहे.
नवीन भिंत उभारणीचे काम सुरू असताना अचानक ही जुनी भिंत कोसळली आणि भिंतीच्या ढिगाऱ्याखाली एकूण सात मजूर अडकले होते.
त्यापैकी पाच जणांना नागरिकांनी ओढून बाहेर काढले होते. यामधील मल्लेश चव्हाण, बंडू कुवासे या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या घटनेवर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माणिक पवार, युवराज गुत्तलवार, विनायक चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. माणिक आणि युवराज या दोघांवर शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनायक केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत आहे.
या दुर्घटनेनंतर विष्णुनगर पोलिसांनी तपास सुरू करत माणिक पवार या मजुराच्या तक्रारीवरुन शिवा एंटरप्रायझेस मुंबई आणि त्यांच्याशी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
कामात निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेकर यांनी सांगितले.