साईबाबा संस्थानबाबत पोस्ट व्हायरल करणे भोवले, बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
शिर्डीतील साईबाब संस्थानबाबत बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्ही 9 मराठीने बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.
शिर्डी : मागील काही दिवसात सोशल मीडियावर साईबाबा संस्थान विरोधात बदनामीकारक पोस्ट व्हायरल करून त्यास धार्मिक रंग दिला जात होता. अशा समाजकंटकांवर संस्थानच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिव्ही 9 मराठीने 13 जून रोजी याबाबत बातमी प्रसारीत केली होती. त्यानंतर आता साईबाबा संस्थानकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांना विशिष्ट धर्माशी जोडण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानने एका विशिष्ट समुदायाला मोठी रक्कम दान दिल्याबद्दल एक व्हॉट्सअॅप पोस्ट प्रसारीत करण्यात आली होती. त्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
मात्र आता साईबाबा संस्थानने चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांविरोधात कडक पाऊले उचलली असून साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी सांगतिलं.
साई संस्थानच्या देणगीबाबत चुकीचे व्हिडिओ केले होते व्हायरल
काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर साईबाबा संस्थानला साईबाबांच्या झोळीत मिळालेल्या देणगीची काही रक्कम एका विशिष्ट समुदायाला देत आहेत असे चुकीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. काही लोकांनी अशी चुकीची माहिती प्रसारित केली होती. त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच काही लोक साईबाबा आणि साईबाबा संस्थानची बदनामी करण्याचा कट रचत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी साईबाबा संस्थानने पोलिसांना केली आहे.
शिर्डी पोलिसांकडून तीन व्हॉट्सअप ग्रुपवर गुन्हा दाखल
तसेच तेलंगणा राज्यात काही व्हाट्सअप ग्रुपवर अशाप्रकारे चुकीचे संदेश प्रसारीत झाल्याने तेथील साईभक्तांनी साई संस्थांनला लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात धनजया नावाच्या व्हॉट्सअॅप नंबरसह साईबाबा संस्थानबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या इतर तीन व्हॉट्सअॅप नंबरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम 295, 153 (ए), 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.