Nashik|पैल्या धारंच्या प्रेमानं साला…हळदीत गाणं वाजलं अन् लग्नाआधीच नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात!
त्यालाही हे लग्न अगदी जंगी करायचे होते. दोस्त कंपनी आलेली. डीजे लावलेला. साऱ्यांनीच बेधुंद होऊन डान्स सुरू केलेला. गाणाचा सूर टिपेला पोहचला आणि मांडवात पोलीस धडकले.
नाशिकः लग्न म्हटले की मौजमजा, धमाल, मस्ती आणि आयुष्यभरासाठी राहील अशी एक सुखद आठवण असते. भले लग्नानंतर अनेकजण संसाराला नाके मुरडू द्यात, पण हा लाडू प्रत्येकाला खायचा असतो. त्याच्याबाबतही नेमके तसेच घडले. त्यालाही हे लग्न अगदी जंगी करायचे होते. दोस्त कंपनी आलेली. डीजे लावलेला. साऱ्यांनीच बेधुंद होऊन डान्स सुरू केलेला. गाणाचा सूर टिपेला पोहचला आणि मांडवात पोलीस धडकले. मग काय लग्नाआधीच वरात निघाली. नेमके काय प्रकरण तुम्हीही समजून घ्या. अन्यथा तुमचाही असाच लोचा होऊ शकतो.
त्याचे झाले असे की…
नाशिकमधल्या मल्हारखानी झोपडपट्टी भागात लग्न सुरू होते. नवरदेवाच्या घरी चांगला मंडप टाकलेला. त्याच्या मित्रांचा गोतावळा होताच, पण पै पाहुणी मंडळी आलेली. एकीकडे सुग्रास अन्नाचा मंद वास घरात दरवळतोय. साऱ्यांचा प्रचंड गोंगाट आहे. कलवऱ्या आणि कलवरे नवनव्या कपड्यात इकडून तिकडे हुंदडत आहेत. नवरदेवाची तयारीही जोरात झालेली. भरजरी ड्रेस, टोप अन् बरेच काही. हळदीचा कार्यक्रम रंगात आलेला. नागीन डान्स सुरू झाला. अनेकांनी मराठी आयटम साँग लावण्याची फर्माईश केली. सगळ्यांच्या अंगात उत्साह संचारला. मग काय नवरदेवालाही गराड्यात ओढले गेले. साऱ्यांनी एकच धमाल सुरू केली. वाढत्या आवाजासोबत पावलांची गतीही वाढली.
अन् इथेच झाला घोळ…
लग्नाच्या या आनंदात ऐन मोक्यावेळी विघ्न आले. त्याचे झाले असे की, मल्हारखानी झोपडपट्टी भाग गंगापूररोड परिसरात येतो. त्यातही एक विशेष म्हणजे इथेच पोलीस आयुक्त कार्यालय आहे. एका घरासमोर प्रचंड गर्दी जमली आहे. मोठमोठाने नाचगाणी सुरू आहेत. त्यात कोरोनाच्या निर्बंधही पायदळी तुडवले जात आहेत. या साऱ्याची खबरबात पोलिसांना मिळाली. लागलीच फोन फिरला. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव पोहचले आणि मांडवात चिडीचूप शांतत झाली.
नवरदेवावरही गुन्हा
पोलिसांनी नवरदेव प्रसाद संतोष बुकानेकडे वाद्य वाजवण्याची परवानगी काढली आहे का, त्याची कागदपत्रे दाखवा अशी विचारणा केली. मात्र, बुकाने परिवाराने आनंदाच्या भरात या साऱ्या नियमांना फाटा दिला होता. मग काय पोलिसांनी तात्काळ वाजंत्री, नवरदेवासह वरपित्याची वरात थेट पोलीस ठाण्यात आणली. नवरदेव, त्याचे वडील, वाजंत्री अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला. हे असे असते. आनंद कुठलाही साजरा करावा. त्याला ना नाही. मात्र, आपण नियम पाळावेत. नसता काय होते, तर आनंदात असेच विघ्न येते.
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः