Bihar : कधी तिच्या कुशीत शिरत, कधी तिच्या पाठी लपत; निरागस बाळाचा आईच्या प्रेतासोबत खेळ, ह्रदय पिळवटून टाकणारा प्रसंग
मुलाला वाटले की त्याची आई झोपली आहे आणि तो तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होता. बराच वेळ निरागस मूल आईसोबत खेळत राहिला. मात्र त्या आईच्या शरिराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून लोकांनी याबाबत जीआरपीला माहिती दिली.
बिहार : बिहारच्या भागलपूर रेल्वे स्थानकावर घडलेल्या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सर्वांचेच ह्रदय पिळवटून टाकत आहे. आपली आई (Mother) जिवंत नसल्याची अर्थात तिने आपली साथ कायमची सोडल्याची समज नसलेल्या निरागस बालका (Child)ने मृत आईच्या प्रेताशी मायेने लपाछपीचा खेळ खेळला. आपल्या आईने जग सोडल्याची त्याच्या बालमनाला कल्पना नव्हती. म्हणूनच तो कधी आईच्या कुशीत शिरून, तर कधी आईच्या पाठी लपत तो स्वतःचीच करमणूक (Entertainment) करीत होता. त्याला या करमणुकीत नेहमीचाच आनंद मिळाला. पण हा प्रसंग पाहणारे रेल्वे प्रवासी चांगलेच हादरून गेले. तेथे उपस्थित सर्वांची मने हेलावली, अनेकांना अश्रू अनावर झाले. आईची मायेची सावली कधीच आपल्यापासून दूर गेल्याची समज त्या निरागसाला नव्हती. पण उर्वरित आयुष्यातील त्याच्या आईची पोकळी कशी भरून निघणार हा प्रश्न सर्वांनाच अस्वस्थ करुन सोडत आहे. देवाने असे दु:ख कोणाला देऊ नये, अशी भावनिक प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली.
निरागस, निष्पाप बाळाची भावना, आई झोपली असेल!
हा सारा प्रसंग मन हेलावून टाकणाराच आहे. घडलेला प्रसंग असा की, भागलपूर स्टेशनवर एका महिलेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह कोणीतरी फलाट क्रमांक 1 च्या जवळ ठेवला होता. तेथे महिलेचा पाच वर्षांचा मुलगा तिच्यासोबत खेळत होता. आईचा मृत्यू झाल्याचे त्याला कळले नव्हते. मुलाला वाटले की त्याची आई झोपली आहे आणि तो तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होता. बराच वेळ निरागस मूल आईसोबत खेळत राहिला. मात्र त्या आईच्या शरिराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहून लोकांनी याबाबत जीआरपीला माहिती दिली. यानंतर रेल्वे पोलीस तेथे पोहोचले.
रेल्वे पोलिसांनी बाळाला पाळणाघरात पाठवले
रेल्वे पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. यासोबतच पोलिसांनी मुलाला ‘चाइल्ड हेल्पलाइन टीम’कडे सुपूर्द केले. त्यानंतर बालकाला चाइल्ड हेल्प डेस्कवर घेऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सदर रुग्णालयात मुलाची आरोग्य तपासणी करून घेतली. येथे मुलाला काही औषध देण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाला सीडब्ल्यूसीसमोर आणण्यात आले. येथून त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली.
मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही
महिलेच्या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही. भागलपूर जीआरपी पोलिस स्टेशनचे प्रभारी अरविंद कुमार यांनी याबाबत सांगितले की, एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळ गाठले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. महिलेची ओळख पटवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे मृतदेह सुरक्षित ठेवण्यात आला आहे. (A child plays with his mothers corpse at Bhagalpur railway station in Bihar)