रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडाली, तीन खलाशांचा बुडून मृत्यू
बोटीत एकूण सात खलाशी होते. यापैकी चौघांना वाचवण्यात यश आले आहे. तिघे बुडाले असून दोघांचे मृतदेह सापडले. तर एक जण अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध सुरु आहे.
पालघर : मासेमारीसाठी गेलेल्या गुजरातमधील बोटीला रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर जलसमाधी मिळाल्याची घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरीतील मिरकवाडा बंदराजवळ ही घटना घडली. बोटीत एकूण सात खलाशी होते. यापैकी चौघांना वाचवण्यात यश आले आहे. तिघे बुडाले असून दोघांचे मृतदेह सापडले. तर एक जण अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध सुरु आहे. लक्ष्मण भिखार वळवी आणि सुरेश भिखार वळवी अशी मयत खलाशांची नावे आहेत. तर मधुकर चैत्या खटाल असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे.
कल्पेश लहान्या भंडार, अंतोन देवल्या भगत, जयवंत जेतऱ्या करपडे आणि दीपक भिखार वळवी अशी बचावलेल्या खलाशांची नावे आहेत. हे चौघेही तलासरी तालुक्यातील पाटकरवाडा येथील रहिवासी आहेत.
नेमके काय घडले?
गुजरात येथील रत्नसागर, गदाधर, कुणेश्वरी 2, कपीध्वज या चार मासेमारी नौका समुद्रात मासेमारी करीत होत्या. रत्नागिरीहून पुन्हा तलासरीच्या दिशेने जात असताना रत्नागिरीतील मिरकवडा येथे समुद्र खवळल्याने या खलाशी बोटी घेऊन तेथेच थांबले होते.
यापैकी रत्नसागर बोटीतील मध्यभागातील फळीचा खिळा लाटांच्या माऱ्यामुळे निखळला आणि बोटीत पाणी शिरले. यावेळी बोटीच्या डेकवर बसलेल्या खलाशांनी आरडाओरडा केला. मात्र बोटीतील सर्वजण बाहेर पडण्याआधीच बोट पाण्यात उलटली.
गदाधर बोटीतील खलाशांनी चौघांना वाचवले
यावेळी बचावलेले चौघे जण उलटलेल्या बोटीवर दोर पकडून चढल्याने बचावले. चौघांचा आरडाओरडा ऐकून जवळच असेल्या गदाधर बोटीतील खलाशांनी या चौघांना वाचवले. मात्र तिघे जण दुर्दैवाने बुडाले. यापैकी बेपत्ता मधुकर खटल हा केबीनच्या खाली झोपला असल्याने त्याला बाहेर पडता आले नसावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.